प्रतिनिधी, 16 ऑक्टोबर: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात सध्या सुरू असलेल्या टी-२० मालिकेच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) महसूल वाटप मॉडेलवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या मालिकेतून यजमान भारताला २० ते ३० दशलक्ष डॉलर्सचा (सुमारे २८४ कोटी रुपये) घसघशीत नफा मिळण्याचा अंदाज आहे, मात्र पाहुण्या वेस्ट इंडिज संघाला यातून एक रुपयाही मिळणार नाही. या विषमतेवर बोट ठेवत क्रिकेट वेस्ट इंडिजचे सीईओ ख्रिस डेरिंग यांनी आयसीसीवर जोरदार टीका केली आहे.
सध्याच्या द्विपक्षीय मालिकेच्या महसूल मॉडेलमध्ये मोठा दोष असून त्यात तातडीने सुधारणा करण्याची गरज असल्याचे डेरिंग यांनी स्पष्ट केले. द्विपक्षीय मालिकेतील १०० टक्के महसूल यजमान देशाला मिळतो. या नियमामुळे कॅरिबियन क्रिकेटचे कंबरडे मोडले असून, उत्पन्नाअभावी हा खेळ आता विनाशाच्या उंबरठ्यावर पोहोचला असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
विस्डेनमधील एका मुलाखतीत बोलताना डेरिंग यांनी १९९७ पूर्वीच्या कार्यपद्धतीची आठवण करून दिली. त्या काळात अत्यंत लोकप्रिय असलेला वेस्ट इंडिजचा संघ जेव्हा विदेश दौऱ्यावर जायचा, तेव्हा त्यांच्या बोर्डाला एक निश्चित शुल्क दिले जायचे. अनेकदा हे शुल्क त्यांच्या मायदेशातील मालिकांमधून मिळणाऱ्या कमाईपेक्षा अधिक असायचे. मात्र नंतर यात बदल करण्यात आला.
आयसीसी सदस्यांनी जेव्हा हे महसूल मॉडेल बदलण्यासाठी मतदान केले, तेव्हा आपण स्वतः तिथे उपस्थित होतो, असे डेरिंग म्हणाले. त्या मतदानात वेस्ट इंडिजचा ९-१ अशा फरकाने पराभव झाला होता. त्या क्षणीच आपण सावध करत म्हटले होते की, 'हा निर्णय आमचा उत्पन्नाचा स्रोत हिरावून घेतोय आणि वेस्ट इंडिज क्रिकेटच्या ऱ्हासावर शिक्कामोर्तब करतोय'.
केवळ द्विपक्षीय मालिकांमध्येच नाही, तर आयसीसीच्या एकूण महसूल वाटपातही प्रचंड तफावत असल्याचे डेरिंग यांनी निदर्शनास आणून दिले. जागतिक बाजारपेठेतील मोठा वाटा आणि भरघोस कमाईच्या जोरावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) आयसीसीच्या निधीतून सर्वाधिक, म्हणजे ३८ टक्क्यांहून अधिक वाटा मिळतो. याउलट, वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाच्या वाट्याला केवळ ५ टक्केच निधी येतो.
१९९७ मध्ये बदलण्यात आलेल्या या नव्या व्यवस्थेमुळे लहान क्रिकेट बोर्डांवर मोठा अन्याय होत असल्याचा दावा त्यांनी केला. जोपर्यंत परदेशी दौऱ्यावर जाणाऱ्या पाहुण्या संघांना द्विपक्षीय मालिकांच्या महसुलात योग्य आणि न्याय्य वाटा दिला जात नाही, तोपर्यंत छोट्या क्रिकेट मंडळांचे अस्तित्व असेच धोक्यात राहील, असा स्पष्ट इशारा ख्रिस डेरिंग यांनी दिला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- IND vs WI: बंगळूरुतील पाचव्या निर्णायक टी२० सामन्यावर पावसाचे सावट; सामना रद्द होणार?
- वैभव सूर्यवंशीचा दिल्ली विमानतळावर संताप; ‘रिल्सच्या नादात…’ म्हणत पापाराझींना सुनावले
- यशस्वी जयस्वालची क्रिकेटच्या मैदानाबाहेर नवी इनिंग; स्वतःचा कपड्यांचा ब्रँड करत व्यवसायात टाकले पाऊल




