विराट कोहलीची ‘लिंक्डइन’वर पहिली पोस्ट; निवृत्तीनंतर ९ ते ५ ची नोकरी करणार? चाहत्यांमध्ये चर्चा

विराट कोहलीने लिंक्डइनवर पहिली पोस्ट करत व्यावसायिक जगात पाऊल ठेवले आहे. यामध्ये त्याने बिझनेस प्लॅन्स आणि भारतातून जागतिक दर्जाचे ब्रँड्स उभारण्यावर भाष्य केले आहे.

mahasatta

प्रतिनिधी, 16 ऑक्टोबर: भारतीय क्रिकेट संघातील स्टार फलंदाज विराट कोहलीने व्यावसायिक जगतात पाऊल ठेवले असून, १३ ऑक्टोबर रोजी त्याने 'लिंक्डइन'वर आपली पहिली पोस्ट केली आहे. कॉर्पोरेट क्षेत्रासाठी ओळखल्या जाणाऱ्या या प्लॅटफॉर्मवर विराटने एन्ट्री केल्याने चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली आहे. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर विराट आता ९ ते ५ ची नोकरी करणार की काय, असा प्रश्न चाहते कमेंट्सच्या माध्यमातून विचारत आहेत.

आपल्या या पहिल्या पोस्टमध्ये विराटने भारताला जागतिक क्रीडा क्षेत्रात एक मोठे स्थान मिळवून देण्याचे स्वप्न व्यक्त केले आहे. देशात केवळ क्रिकेटलाच नव्हे, तर इतर सर्व खेळांनाही समान महत्त्व मिळावे आणि लोकांनी प्रत्येक खेळाचा आनंद घ्यावा, अशी इच्छा त्याने व्यक्त केली आहे. तसेच, भारतातून जागतिक दर्जाचे खेळाडू घडावेत, यावर त्याने भर दिला आहे.

याशिवाय, विराटने आपल्या व्यावसायिक कामांची आणि भविष्यातील योजनांची माहिती या पोस्टद्वारे दिली आहे. 'अजिलिटास स्पोर्ट्स' (Agilitas Sports) मध्ये तो गुंतवणूकदार असून 'वन८वर्ल्ड' (one8world) या ब्रँडचा सहसंस्थापक असल्याचे त्याने नमूद केले आहे. भारतातूनच असे क्रीडा ब्रँड तयार करण्याचा विचार त्याने मांडला आहे, जे भविष्यात जगभरात आपली वेगळी ओळख निर्माण करतील.

पोस्टच्या शेवटी विराटने भविष्यात दीर्घकाळ टिकून राहील असा व्यवसाय उभा करण्याची महत्त्वाकांक्षा बोलून दाखवली आहे. त्याला भारतातूनच जागतिक स्तरावर पोहोचणारा क्रीडा व्यवसाय निर्माण करायचा आहे. विराटची ही लिंक्डइन पोस्ट म्हणजे क्रिकेटच्या मैदानाच्या पलीकडे जाऊन व्यावसायिक विश्वात त्याने अधिकृतपणे ठेवलेल्या पावलाची झलक मानली जात आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

MahaSatta News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या