यशस्वी जयस्वालची क्रिकेटच्या मैदानाबाहेर नवी इनिंग; स्वतःचा कपड्यांचा ब्रँड करत व्यवसायात टाकले पाऊल

भारतीय कसोटी संघाचा सलामीवीर यशस्वी जयस्वालने ‘YBJ Fits’ या नव्या ब्रँडची घोषणा करत स्वतःच्या व्यवसायाची सुरुवात केली आहे.

mahasatta

प्रतिनिधी, 16 ऑक्टोबर: भारतीय कसोटी संघाचा नियमित सलामीवीर यशस्वी जयस्वालने क्रिकेटच्या मैदानावर सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. आता त्याने मैदानाबाहेरही एक मोठे पाऊल उचलले असून चाहत्यांना मोठी 'गुड न्यूज' दिली आहे. यशस्वीने स्वतःच्या व्यवसायात पदार्पण करत एक नवी इनिंग सुरु केली आहे.

यशस्वीने इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे आपल्या नव्या व्यवसायाची स्वतः घोषणा केली आहे. त्याने 'YBJ Fits' (वायबीजे फिट्स) या नावाने स्वतःचा ब्रँड सुरु केला असून, ही कंपनी कपडे आणि बॅग्सचे उत्पादन करणार आहे. या ब्रँडसाठी त्याने एक खास पेज तयार केले आहे, जिथे सर्व माहिती आणि कंपनीचा लोगोही समोर आला आहे. सध्या त्याच्या पेजवर टी-शर्ट आणि लगेज (बॅग्स) दिसत असून, ते लवकरच ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहेत.

स्वतःचा व्यवसाय सुरु करणारा यशस्वी हा पहिला क्रिकेटपटू नाही. यापूर्वी सचिन तेंडुलकर, एम. एस. धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांसारख्या दिग्गज खेळाडूंनीही आपले व्यवसाय सुरु केले आहेत. कसोटी संघात पक्के स्थान असलेला यशस्वी अद्याप टी-२० आणि वनडे संघात मात्र कायमस्वरूपी जागा मिळवू शकलेला नाही. दरम्यान, तो क्रिकेटमध्येही नवे प्रयोग करत आहे. यापूर्वी तो फिरकी गोलंदाजी करायचा, मात्र नुकताच तो रणजी करंडक स्पर्धेच्या सरावादरम्यान यष्टीरक्षण करतानाही दिसला होता.

भारतीय संघ या महिन्यात न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे, जिथे टीम इंडिया ५ टी-२०, ५ वनडे आणि २ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या कसोटी मालिकेच्या तयारीसाठी बीसीसीआयने प्रथम इंडिया ‘अ’ संघाला न्यूझीलंडला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. तिथे ३ सामन्यांची अनधिकृत मालिका खेळवली जाणार आहे. २४ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या मालिकेच्या संघात यशस्वी जयस्वालचाही समावेश करण्यात आला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

MahaSatta News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या