प्रतिनिधी, 14 ऑक्टोबर: भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू आणि प्रशिक्षक संजय बांगर यांची ट्रान्सजेंडर लेक अनाया बांगर आता ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर आपली छाप पाडणार आहे. लिंगबदल शस्त्रक्रियेनंतर काही वर्षे तिला क्रिकेट खेळण्यासाठी योग्य प्लॅटफॉर्म मिळत नव्हता. मात्र, अखेर तिच्या मेहनतीला यश आले असून क्रिकेट ऑस्ट्रेलियाने तिला त्यांच्या देशात खेळण्याची अधिकृत परवानगी दिली आहे. त्यामुळे २०२७ पासून ती ऑस्ट्रेलियामध्ये क्रिकेट खेळताना दिसणार आहे.
आर्यनवरून अनाया बनण्यापर्यंतचा तिचा प्रवास सोपा नव्हता. लिंगबदल करण्यापूर्वी तिने मुंबईसाठी विविध स्तरांवर क्रिकेट खेळले होते. विविध शोमध्ये तिने या कठीण प्रवासाबाबत खुलासे केले आहेत. तिने भारतीय संघाकडून खेळण्याचाही प्रयत्न केला होता, परंतु त्यात तिला यश आले नाही. आयसीसीच्या (ICC) नियमांनुसार, वयात आल्यानंतर (प्युबर्टी) ट्रान्सजेंडर झालेल्या महिलांना आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये खेळण्यावर मर्यादा आहेत.
भारतात संधी न मिळाल्याने अनाया आता ऑस्ट्रेलियाच्या 'वुमेन्स सामुदायिक क्रिकेट'मध्ये खेळताना दिसणार आहे. नियमानुसार, अनायाच्या रक्तातील टेस्टोस्टेरॉनची पातळी १० नॅनोमोल्स प्रती लीटरपेक्षा कमी असेल, तरच तिला 'बीबीएस'मध्ये (BBS) खेळता येईल. तिची टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी असल्याने आता ती ऑस्ट्रेलियाकडून मैदान गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे.
अनायाने आगामी वाटचालीसाठी जोरदार सराव सुरू केला आहे. अलीकडेच सराव करताना एकामागून एक उत्तुंग षटकार मारून तिने मैदानात अक्षरशः तांडव केले आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. तिच्या या धमाकेदार कमबॅकची सध्या जोरदार चर्चा होत आहे. विशेष म्हणजे, या सरावादरम्यान क्रिकेटपटू सरफराज खान, मुशीर खान आणि नौशाद खान हे तिघे तिला भेटण्यासाठी आले होते. यावेळी अनायाने सरफराज आणि मुशीर यांची गळाभेट घेतली आणि त्यांच्यासोबत सरावही केला.





