प्रतिनिधी, 14 ऑक्टोबर: नितेश तिवारी दिग्दर्शित बहुचर्चित 'रामायण' चित्रपटाचा पहिला भाग जगभरात प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. येत्या ५ नोव्हेंबरला हा चित्रपट जगभरातील सिनेमागृहांमध्ये झळकणार आहे. याच दिवशी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात राजकीय नेत्यांसाठी या चित्रपटाचे विशेष स्क्रीनिंग आयोजित करण्याची योजना आखली जात असल्याची मोठी माहिती समोर आली आहे.
मिड-डेने दिलेल्या वृत्तानुसार, 'रामायण: पार्ट १' च्या या खास स्क्रीनिंगसाठी निर्माते आवश्यक परवानग्या मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटाच्या जागतिक प्रदर्शनाच्या दिवशीच हे स्क्रीनिंग ठेवण्याचा विचार सुरू आहे. या कार्यक्रमाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, या स्क्रीनिंगला दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्यासह रणबीर कपूर, यश आणि साई पल्लवी उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
याव्यतिरिक्त निर्माते या पौराणिक चित्रपटाचे दोन प्रीमियर आयोजित करण्याच्या तयारीत आहेत. यापैकी एक प्रीमियर मुंबईतील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर (NMACC) येथे, तर दुसरा प्रीमियर दिल्लीत होऊ शकतो. याबाबतही स्टार्स आणि आयोजनाच्या अधिकृत पुष्टीची प्रतीक्षा आहे. 'रामायण'मध्ये रणबीर कपूर श्रीराम, यश रावण, साई पल्लवी सीतामाई, रवी दुबे लक्ष्मण आणि सनी देओल हनुमान यांच्या भूमिकेत दिसणार आहेत.
या प्रमुख कलाकारांसोबतच रकुल प्रीत सिंग, लारा दत्ता, विवेक ओबेरॉय, शीबा चढ्ढा, अरुण गोविल आणि इंदिरा कृष्णन यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका या चित्रपटात आहेत. चित्रपटाचा ट्रेलर समोर आल्यानंतर प्रेक्षकांची याबद्दलची उत्सुकता प्रचंड वाढली असून, ते ही पौराणिक कथा मोठ्या पडद्यावर पाहण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.





