जालना, 14 ऑक्टोबर: राज्यात भीषण दुष्काळाची परिस्थिती असताना जालन्यातून एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांची उभी पिके जळून खाक झाली असताना, दुसरीकडे एका भजन कार्यक्रमात भाजपचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्यावर चक्क नोटांची उधळण करण्यात आली. ज्या जालन्यामध्ये दुष्काळाची तीव्रता अधिक आहे, तिथेच हा प्रकार घडल्याने सर्वत्र तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
काल रात्री जालना शहरातील मंमादेवी मंदिर परिसरात हा भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या गोरंट्याल यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव 'मै हुँ डॉन…' या गाण्यावर ठेका धरला. याच वेळी त्यांच्यावर पैशांची उधळण करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच आणि संतप्त प्रतिक्रिया उमटू लागताच भाजप नेत्याने यावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे.
यावर स्पष्टीकरण देताना कैलास गोरंट्याल म्हणाले की, "कार्यक्रमापूर्वी मी देवाकडे शेतकऱ्यांसाठी प्रार्थना केली. भजनामध्ये माणूस मंत्रमुग्ध होतो, तेव्हा कोण काय करतो हे माहीत होत नाही." आरतीनिमित्त गेलो असता कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर त्यांच्या मनाप्रमाणे वागावे लागते, असे ते म्हणाले. "आपण पुढाऱ्यासारखं वागलं तर कार्यकर्ते सोबत येत नाहीत, म्हणून त्यांच्यासारखंच वागावं लागतं. प्रामाणिकपणाने सांगतो, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी आमचं सरकार आणि आम्ही कटिबद्ध आहोत," असा दावाही त्यांनी केला.
एकीकडे शेतकऱ्यांवर पिकांवर रोटावेटर फिरवण्याची वेळ आली असून त्यांच्या डोळ्यांत अश्रू आहेत. या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने राज्यातील ३५८ पैकी ३०५ तालुक्यांमध्ये आधीच दुष्काळ जाहीर केला होता. त्यात आज आणखी ४० तालुक्यांची भर पडली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीपूर्वी तातडीची मदत म्हणून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी ५ हजार रुपये जमा करण्याची घोषणा केली आहे. उर्वरित रक्कम नंतर दिली जाणार असून चारा आणि पाण्याचीही व्यवस्था करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- पत्नीला लागते गावकऱ्यांची नजर; नवरा-बायकोच्या गोड भांडणाचे ‘नस नस क्यों दुखै’ गाणे सोशल मीडियावर हिट
- २० वर्षांपूर्वी सोनाली बेंद्रेकडून स्वीकारलं बक्षीस; प्राजक्ता माळीचा ‘तो’ बालपणीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल
- विद्यार्थ्यांच्या अमानुष मारहाणीवरून राहुल गांधी आक्रमक; मोदी, शहांसह पोलिसांना दिला थेट इशारा





