विद्यार्थ्यांच्या अमानुष मारहाणीवरून राहुल गांधी आक्रमक; मोदी, शहांसह पोलिसांना दिला थेट इशारा

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनात पोलिसांनी विद्यार्थ्यांना केलेल्या अमानुष मारहाणीवरून लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी आक्रमक झाले आहेत.

mahasatta

दिल्ली, 14 ऑक्टोबर: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनात पोलिसांनी विद्यार्थ्यांना केलेल्या अमानुष मारहाणीवरून लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी आक्रमक झाले आहेत. त्यांनी या प्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यासह पोलिसांना थेट इशारा दिला आहे.

काँग्रेस आणि सीजेपीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या या आंदोलनात सहभागी झालेल्या काही विद्यार्थ्यांनी राहुल गांधी यांच्या नेतृत्वात माध्यमांसमोर येत आपली आपबित्ती मांडली. यामध्ये तीन मुली आणि तीन मुलांचा समावेश होता. पोलिसांनी अत्यंत अश्लाघ्य भाषेत शिवीगाळ करत गुप्तजागांवर मारहाण केल्याचा गंभीर आरोप या विद्यार्थ्यांनी केला. तसेच, आंदोलक विद्यार्थ्यांविरोधात पोलिसांचा वापर नाझींसारखा केला जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

विद्यार्थ्यांच्या व्यथा ऐकल्यानंतर राहुल गांधींनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले. अमित शाह यांना उद्देशून ते म्हणाले की, "हा हिंदुस्थान आहे, हे तुम्ही चांगल्या प्रकारे पाहा. येथे कोणी हिंदू, मुस्लीम, शिख नाही. कोणी कोणत्या जातीचे, स्त्री किंवा पुरुष नाही. हा केवळ एक आवाज आणि एक आंदोलन आहे."

"पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तुम्ही या आवाजासमोर उभे आहात. पण माझी तुम्हाला सूचना आहे की, या आवाजासमोर उभे राहू नका. या आवाजाच्या विरोधात कोणीही उभं ठाकू शकत नाही," असा सज्जड दम राहुल गांधी यांनी दिला.

पोलिसांना उद्देशूनही राहुल गांधींनी ताकीद दिली. सर्व विद्यार्थ्यांनी पोलिसांच्या मारहाणीचे व्हिडिओ रेकॉर्ड करून पुरावे जवळ ठेवावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या. "आमच्याकडेही असे पुरावे आहेत. जेव्हा हे प्रकरण संपेल, तेव्हा या पुराव्यांचा वापर करून संबंधितांना नक्कीच शिक्षा दिली जाईल," असे ते म्हणाले.

"वरपासून ते खालपर्यंत सर्वांना शिक्षा होईल. नरेंद्र मोदी, अमित शाह, ज्ञानेश कुमार आणि विद्यार्थ्यांवर हात उचलणाऱ्या प्रत्येक पोलीस शिपायाचे पुरावे आमच्याकडे आहेत. त्यामुळे घाबरू नका, लव्ह यू, थँक यू," असा धीर राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांना दिला.

📌 महत्वाच्या बातम्या

MahaSatta News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या