प्रतिनिधी, 14 ऑक्टोबर: मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री आणि लावणीसम्राज्ञी मधू कांबीकर यांच्या निधनामुळे संपूर्ण मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनानंतर अभिनेते मिलिंद गवळी यांनी सोशल मीडियावर एक अत्यंत भावूक पोस्ट लिहित आपल्या ऑनस्क्रीन ‘आई’ला श्रद्धांजली वाहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी आयुष्याची अनिश्चितता आणि मधुबाईंसोबतच्या अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
माणसाचा जन्म आणि मृत्यू यावर कोणाचेच नियंत्रण नसते, पण माणसाचे जगणंसुद्धा त्याच्या हातात नसते, अशी खंत मिलिंद गवळी यांनी व्यक्त केली. याच संदर्भात त्यांनी अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांच्या दुर्दैवी निधनाची आठवण काढली. रंगमंचावर कला सादर करतानाच अश्विनी एकबोटे यांनी अखेरचा श्वास घेतला होता. कांबीकर यांच्या बाबतीतही दहा वर्षांपूर्वी अशीच घटना घडल्याचे गवळी यांनी सांगितले. एका स्टेज शोमध्ये नृत्य करताना गिरकी घेतल्यानंतर त्या चक्कर येऊन पडल्या आणि कोमात गेल्या. जवळपास दशकभर त्या अंथरुणाला खिळून होत्या आणि त्यानंतर त्यांची प्राणज्योत मालवली.
मधू कांबीकर यांच्यासोबतच्या व्यावसायिक आणि कौटुंबिक नात्याविषयी गवळी यांनी सविस्तर लिहिले आहे. त्यांनी एकत्र चार चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यापैकी ‘काळभैरव’, ‘मैत्री जीवाची’ आणि ‘महिमा खंडोबाचा’ या तीन चित्रपटांत कांबीकर यांनी गवळी यांच्या आईची भूमिका साकारली होती. अतिशय सुंदर, घरंदाज आणि प्रेमळ असलेल्या मधुबाईंमुळे त्यांच्यात खऱ्या अर्थाने आई-मुलाचे जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले होते. याशिवाय ‘दुर्गा म्हणत्यात मला’ या चित्रपटात त्यांनी कुलदीप पवार यांच्यासोबत साकारलेली नकारात्मक भूमिकाही अतिशय ताकदीची होती, अशी आठवण गवळी यांनी सांगितली.
या पोस्टमध्ये त्यांनी एका खास वाढदिवसाचा किस्साही सांगितला. बारामतीजवळील ‘निरा’ या गावात शूटिंग सुरू असताना मधुबाईंचा वाढदिवस होता. त्यांनी ही गोष्ट कोणालाही सांगितली नव्हती, पण मिलिंद गवळी, अभिनेत्री दिपाली सय्यद, निर्माते आणि संपूर्ण युनिटने त्यांना सरप्राईज देण्याचे ठरवले. त्यांनी पुण्याहून मधुबाईंचा सख्खा मुलगा प्रीतम याला तिथे बोलावून घेतले होते. हे सरप्राईज पाहून त्या इतक्या आनंदी झाल्या होत्या की, अनेक दिवस त्या याबद्दल भरभरून बोलत होत्या.
कांबीकर यांच्या निधनाची बातमी महेश टिळेकर यांनी फोनवरून दिल्याचे गवळी यांनी नमूद केले. त्यावेळी दोघेही मुंबईत होते. बातमी कळताच दहा-पंधरा मिनिटांतच ते पुण्यात अंत्यसंस्कारासाठी रवाना झाले. प्रवासात ते मधुबाईंच्याच आठवणी काढत होते. मधू कांबीकर या अत्यंत उत्तम नृत्यांगना होत्या. त्यांच्या नृत्यातील परफेक्शन सांगताना गवळी यांनी एक किस्सा शेअर केला. एकदा नृत्य करत असताना तबला वादकाचा ठेका चुकला होता, त्यावेळी 'इतकी वर्षे रियाज करूनही ठेका कसा चुकतो?' असा थेट सवाल करत मधुबाईंनी राग व्यक्त केला होता. या सर्व आठवणी सांगत गवळी यांनी त्यांना भावपूर्ण निरोप दिला आहे.





