प्रतिनिधी, 14 ऑक्टोबर: सीजेपीला मोठा धक्का बसला असून, जंतरमंतरवर आंदोलन केल्याप्रकरणी आशुतोष रांका आणि सौरव दास या दोन प्रमुख नेत्यांना ५ दिवसांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अभिजीत दिपके हे नागपूरहून दिल्लीत दाखल होण्यापूर्वीच पोलिसांनी या नेत्यांवर कारवाई केली आहे.
काल रात्री उशिरा दिल्ली पोलिसांनी आशुतोष रांका, सौरव दास यांच्यासह अजिंक्य शिंदे यांनाही अटक केली. आज सकाळी त्यांना मंदिर मार्ग पोलीस ठाण्यातील विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. जंतरमंतरच्या प्रतिबंधित क्षेत्रात बेकायदेशीर प्रवेश करणे आणि दंडाधिकाऱ्यांनी घातलेल्या अटी-शर्तींचे उल्लंघन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. यानंतर रांका आणि दास यांची पाच दिवसांसाठी थेट तुरुंगात रवानगी करण्यात आली.
या कारवाईबाबत रत्ना सिंग यांनी सोशल मीडियावर माहिती शेअर केली आहे. 'दिल्ली पोलिसांनी जंतरमंतर प्रकरणात सौरव दास, आशुतोष रांका आणि अजिंक्य शिंदे यांना पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यात अटक केली आहे. त्यांच्यावर अनधिकृत प्रवेश, बंधपत्रातील अटींचे उल्लंघन आणि सरकारी कर्मचाऱ्याच्या कर्तव्यात अडथळा आणल्याचे आरोप आहेत,' असे त्यांनी स्पष्ट केले. या नेत्यांना आता न्यायालयीन कोठडीत तिहार तुरुंगात पाठवले जाण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे, सौरव दास आणि आशुतोष रांका यांची ही दुसरी अटक आहे. यापूर्वी दिल्लीत आल्यावर त्यांना पोलिसांनी अटक करून सशर्त जामीन दिला होता. मात्र, त्यांनी पुन्हा जंतरमंतरवर जाण्याचा प्रयत्न केल्याने ही कारवाई झाली. दरम्यान, अभिजीत दिपके हे नागपूरहून रवाना झाले असून आज दुपारी एक वाजेपर्यंत ते दिल्ली विमानतळावर पोहोचतील. दिल्लीत दाखल होण्यापूर्वी त्यांनी आशुतोष आणि सौरभ यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली असून, आता ते कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





