प्रतिनिधी, 14 ऑक्टोबर: पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मोठा उलटफेर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजीच्या चर्चा सुरू असतानाच, ऐन निवडणुकीत शिवसेनेकडून भाजपला धक्का दिला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिंदे गटाकडून या निवडणुकीत अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना पाठिंबा मिळण्याची चिन्हे आहेत.
नंदनवन बंगल्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने नुकतीच एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत सचिन सानप यांच्या नावावर चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. सानप हे स्वतः प्राध्यापक असून ते अनेक वर्षांपासून शिक्षकांचे प्रश्न मांडत आहेत. ते मंत्री उदय सामंत यांचे निकटवर्तीय मानले जातात. पक्षातील सर्व खासदार, आमदार आणि नेत्यांना सानप यांना पाठिंबा देण्याचे आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
या बैठकीसाठी मंगेश चिवटे यांना तातडीने नंदनवनवर बोलावून घेण्यात आले होते. चिवटे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. या बैठकीला उदय सामंत, शंभूराज देसाई, प्रकाश आबिटकर, ओमराजे निंबाळकर, भावना गवळी, विजय शिवतरे, शहाजीबापू पाटील आणि रवींद्र धंगेकर यांच्यासह इतर महत्त्वाचे नेते उपस्थित होते.
या बैठकीबाबत माहिती देताना नेते रवींद्र धंगेकर यांनी सांगितले की, पुणे शिक्षक मतदारसंघाबाबत एकनाथ शिंदे यांनी सर्वांना पक्षाच्या भूमिकेबाबत आणि निवडणूक कशी लढवायची यावर मार्गदर्शन केले. मंगेश चिवटे यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे आता कोणाला पाठिंबा द्यायचा, यावर बैठकीत साधक-बाधक चर्चा झाली. पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचे नेते या वेळी उपस्थित होते.
आज मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला एकनाथ शिंदे हजर नव्हते, त्यामुळे नाराजीच्या बातम्या पसरल्या होत्या. मात्र, असा कोणताही नाराजीचा विषय नसल्याचा दावाही धंगेकर यांनी यावेळी केला. त्यामुळे आता पुणे शिक्षक मतदारसंघात शिवसेनेची पुढील रणनीती काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





