प्रतिनिधी, 13 ऑक्टोबर: राज्यात पावसाची दडी आणि वाढत्या तापमानामुळे खरीप हंगाम वाया गेला आहे. मात्र, हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी परतीच्या पावसाबाबत एक महत्त्वाचा अंदाज वर्तवला असून, २० ते २५ ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रात पाऊस परतण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
सध्या राज्यावर दुष्काळाचे सावट असून ऑक्टोबर महिन्यात मुंबई, पुण्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानात मोठी वाढ झाली आहे. उभी पिके जळून गेल्याने शेतकऱ्यांच्या हातून खरीप हंगाम निसटला आहे. आता उरली-सुरली आशा रबी हंगामावरच अवलंबून असून, एका-दोन पावसाच्या सरी रबीसाठी फायदेशीर ठरतील, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.
पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ ऑक्टोबरपर्यंत राज्यात पावसाची कोणतीही स्थिती नाही. मात्र, दसरा संपल्यानंतर १८ ऑक्टोबरपासून वातावरणात बदल जाणवू लागतील. त्यानंतर २० ते २५ ऑक्टोबर या काळात राज्यात परतीचा पाऊस हजेरी लावेल.
या परतीच्या पावसामुळे रबी हंगामातील पेरण्या शक्य होतील आणि विशेषतः ज्वारीचे पीक या पावसावर येऊ शकते, असे डख यांनी सांगितले. मात्र, हा पाऊस राज्यात सर्वत्र एकाच वेळी पडणार नाही. काही भागांमध्ये चांगला पाऊस होईल, तर काही ठिकाणी केवळ रिमझिम पावसाची नोंद होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.






