निवडणूक आयोग, मतचोरी आणि SIR: राहुल गांधींच्या निवासस्थानी विरोधकांची बैठक, मुख्य आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी रणनीती

राहुल गांधी यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांनी निवडणूक आयोग आणि मतचोरीच्या मुद्द्यावरून पुढील रणनीती ठरवली असून मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

mahasatta

प्रतिनिधी, 13 ऑक्टोबर: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या निवासस्थानी 'इंडिया' आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. चहापानाच्या या कार्यक्रमात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावरील कारवाई, 'मतचोरी' आणि 'एसआयआर' (SIR) प्रक्रियेबाबत पुढील संयुक्त रणनीती निश्चित करण्यात आली. यानंतर आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगाविरोधातील आपली भूमिका स्पष्ट केली.

या बैठकीला काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांच्यासह समाजवादी पक्ष आणि काँग्रेसचे खासदार उपस्थित होते. याशिवाय आयसाच्या (AISA) अध्यक्षा नेहा बोरा आणि नागरी समाजातील सदस्यही सहभागी झाले होते. मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात संपूर्ण विरोधकांना एकत्र करत पुन्हा रस्त्यावर उतरण्याची तयारी राहुल गांधी करत आहेत.

पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी ज्ञानेश कुमार यांच्यावर निवडणूक व्यवस्था उद्ध्वस्त केल्याचा आणि लोकशाहीच्या हत्येचा आरोप केला. "ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा हेच आता आमचे ध्येय असून मतचोरीत सहभागी असलेल्या कोणालाही जबाबदार धरले जाईल. आम्ही पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि ज्ञानेश कुमार यांना सोडणार नाही," असा इशारा त्यांनी दिला. तर, मल्लिकार्जुन खर्गे यांनी आदल्या दिवशीचे आंदोलन यशस्वी झाल्याचे सांगत, नवरात्र आणि दुर्गापूजेच्या पार्श्वभूमीवर तूर्तास रस्त्यावरील आंदोलने टाळण्यावर आघाडीच्या नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती दिली.

तृणमूल काँग्रेसच्या खासदार सागरिका घोष यांनी ज्ञानेश कुमार यांना मतचोरीचे सूत्रधार ठरवले. "मते चोरण्यासाठीच त्यांनी एसआयआर आणले, त्यामुळे त्यांना बडतर्फ करेपर्यंत आमचा लढा सुरूच राहील," असे त्या म्हणाल्या. ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी या आंदोलनात आता शेतकरी संघटना आणि नागरी समाजही सहभागी होणार असल्याचे स्पष्ट केले. समाजवादी पक्षाच्या खासदारांनी आपण आघाडीसोबत असल्याचे सांगितले, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी सरकार लोकशाही चिरडण्याची चूक करत असल्याचा आरोप करत आंदोलन सुरूच राहील असा निर्धार व्यक्त केला.

डाव्या पक्षाचे नेते डी. राजा यांनीही ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. राजद नेते तेजस्वी यादव यांनी घटनात्मक संस्थांवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत, 'ज्ञानेश गुप्ता' यांना वाचवण्यासाठीच आंदोलनाचे ठिकाण बदलण्यात आल्याचा दावा केला. शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांचा उल्लेख 'माफिया' असा करत, सरकार स्वतःच्या बचावासाठी त्यांना हटवत नसल्याची टीका केली. आयसाच्या अध्यक्षा नेहा बोरा यांनीही आंदोलन करण्याचा हक्क हिरावून घेणे चुकीचे असल्याचे सांगत भाजपवर लोकशाहीवर हल्ला केल्याचा आरोप केला.

📌 महत्वाच्या बातम्या

MahaSatta News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या