प्रतिनिधी, 13 ऑक्टोबर: क्रिकेटच्या नियमांमध्ये मेरीलेबोन क्रिकेट क्लबने (एमसीसी) एक महत्त्वाचा बदल केला आहे. आता जर चेंडू नॉन-स्ट्रायकर एन्डच्या विकेटला लागून घरंगळत बॅटिंग एन्डच्या स्टंप्सवर आदळला, तर फलंदाजाला बाद दिले जाणार नाही.
एमसीसीचे अध्यक्ष फ्रेझर स्टीवर्ट यांनी एका व्हिडिओद्वारे या नव्या नियमाची माहिती दिली. त्यांनी एका ज्युनियर काउंटी सामन्याचा दाखला दिला, जिथे फलंदाजाने मारलेला चेंडू आधी नॉन-स्ट्रायकर एन्डच्या यष्टींना लागला आणि नंतर घरंगळत जाऊन बॅटिंग एन्डच्या यष्टींना धडकला होता.
क्रिकेटच्या जुन्या नियमांनुसार, त्या सामन्यात फलंदाजाला बाद घोषित करण्यात आले होते. अशा दुर्मिळ घटनांमध्ये तांत्रिकदृष्ट्या फलंदाज बाद होण्याची शक्यता कायम होती. मात्र, एमसीसीने हा नियम बदलून संभाव्य वाद किंवा संभ्रम दूर केला आहे.
या व्यतिरिक्त १ ऑक्टोबरपासून क्रिकेटचे आणखी काही नवे नियम लागू करण्यात आले आहेत. जर एखादा फलंदाज पुढचा चेंडू खेळण्यासाठी जाणूनबुजून विलंब करत असेल, तर त्याला दुसरी ताकीद दिली जाईल. तिसऱ्यांदा अशी चूक केल्यास क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला पाच दंडात्मक धावा मिळतील.
तसेच, दोन्ही संघांच्या कर्णधारांनी संमती दिल्यास दिवसा खेळवल्या जाणाऱ्या कसोटी सामन्यांमध्ये गुलाबी चेंडूचा वापर करता येणार आहे. यासोबतच, दिवसाच्या खेळातील शेवटच्या षटकात जर एखादा फलंदाज बाद झाला, तर खेळ लगेच न संपवता नव्या फलंदाजाला क्रीजवर यावे लागेल, असाही बदल एमसीसीने केला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- माधुरी दीक्षितचे पती डॉ. श्रीराम नेने यांनी कसं घटवलं २१ किलो वजन? नव्या पुस्तकातून शेअर केलं फिटनेस सीक्रेट
- नाना पाटेकर-तनुश्री दत्ता वाद: अमिताभ बच्चन यांच्या ‘त्या’ प्रतिक्रियेवर तनुश्रीने व्यक्त केला होता संताप
- आई शाळेत उशिरा आली अन् तो क्रिकेटपटू बनला; रणजीमध्ये ९ बळी घेणाऱ्या तनय त्यागराजनची रंजक कहाणी





