भुवनेश्वर कुमारनंतर आता मोहम्मद शमीचं टीम इंडियात कमबॅक होणार? रणजीतील दमदार कामगिरीनंतर एमएसके प्रसाद यांची शिफारस

रणजी ट्रॉफीतील शानदार कामगिरीनंतर एमएसके प्रसाद यांनी मोहम्मद शमीच्या टीम इंडियातील पुनरागमनाची शिफारस केली आहे. वयाच्या कारणामुळे शमी साडेतीन वर्षे संघाबाहेर आहे.

mahasatta

प्रतिनिधी, 13 ऑक्टोबर: अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने भारतीय संघात पुनरागमन केल्यानंतर आता मोहम्मद शमीच्या कमबॅकची चर्चा रंगू लागली आहे. रणजी ट्रॉफीच्या नव्या हंगामात दिल्लीविरुद्ध चार विकेट्स घेत शमीने आपला फॉर्म सिद्ध केला आहे. या दमदार कामगिरीनंतर भारताचे माजी मुख्य निवडकर्ते एमएसके प्रसाद यांनी शमीचा संघात समावेश करण्यासाठी जोरदार वकिली केली आहे.

'इंडिया टुडे'ला दिलेल्या एका मुलाखतीत एमएसके प्रसाद यांनी शमीला कसोटी आणि एकदिवसीय संघात संधी देण्याची शिफारस केली. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भुवनेश्वर कुमारची संघात निवड झाली आहे. गेल्या दोन-तीन आयपीएल हंगामांत ४५ पेक्षा जास्त विकेट्स घेतल्याने भुवनेश्वर या स्थानासाठी पूर्णपणे पात्र असल्याचे प्रसाद यांनी सांगितले. याच धर्तीवर आता निवड समितीने मोहम्मद शमीचाही अत्यंत गांभीर्याने विचार करायला हवा, असे मत त्यांनी मांडले.

शमीच्या योगदानाचे कौतुक करताना प्रसाद म्हणाले, "कोणी असा खेळाडू आहे ज्याने 2015, 2019 आणि 2023 वनडे वर्ल्ड कपमध्ये भारतासाठी दमदार प्रदर्शन केलं आहे, अजूनही चांगली गोलंदाजी करतोय, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध सीरीजमध्ये त्याला भारतीय संघाकडून खेळताना पहायला आवडेल." तसेच, जेव्हा जसप्रीत बुमराह संघात नसतो तेव्हा त्याच्या अनुभवाची कमतरता जाणवते, अशा वेळी शमीसारखा गोलंदाज संघात असणे नक्कीच फायद्याचे ठरते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मोहम्मद शमी आपल्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर सातत्याने बीसीसीआयचे दरवाजे ठोठावत आहे. एमएसके प्रसाद यांच्या आधीही अनेक दिग्गजांनी त्याच्या कमबॅकबद्दल सकारात्मक मत मांडले आहे. मात्र, केवळ वयाच्या कारणामुळे गेल्या तीन ते साडेतीन वर्षांपासून तो भारतीय संघाबाहेर आहे. आता आगामी मालिकांसाठी निवड समिती शमीला खरोखरच संधी देणार का, हे लवकरच स्पष्ट होईल.

📌 महत्वाच्या बातम्या

MahaSatta News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या