प्रतिनिधी, 13 ऑक्टोबर: बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितचे पती डॉ. श्रीराम नेने यांनी तब्बल २१ किलो वजन घटवून सर्वांना थक्क केले आहे. नुकत्याच प्रकाशित झालेल्या '21 Days to Good Health!' या त्यांच्या नव्या पुस्तकातून त्यांनी स्वतःचे वजन कमी करण्याचे आणि निरोगी आयुष्याचे सीक्रेट उलगडले आहे. माधुरी सध्या 'कोण होणार करोडपती' या मराठी क्विझ शोचे सूत्रसंचालन करत असल्याने चर्चेत असतानाच, आता डॉ. नेनेंच्या फिटनेस प्रवासानेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
हृदयविकारतज्ज्ञ (Heart Surgeon) म्हणून काम करताना आलेला अनुभव सांगताना डॉ. नेने म्हणाले की, अनेक रुग्णांना त्यांनी मृत्यूशी झुंज देताना पाहिले आहे. काही मिलीसेकंदांच्या फरकाने रुग्णांचे प्राण वाचवताना त्यांना नेहमी जाणवले की, या परिस्थितीचे मूळ हे व्यक्तीच्या गेल्या २०-३० वर्षांतील जगण्याच्या पद्धतीत दडलेले असते. त्यामुळे आजारी पडल्यावर उपचार करण्यापेक्षा, आजार टाळण्यासाठी आधीच हेल्दी सवयी अंगीकारणे अधिक गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नवीन सवय लावण्याबाबत त्यांनी १९६० च्या दशकातील प्लास्टिक सर्जन मॅक्सवेल माल्ट्झ यांच्या सिद्धांताचा संदर्भ दिला. माल्ट्झ यांच्या मते नव्या सवयीशी जुळवून घेण्यासाठी २१ दिवस लागतात, मात्र बदलत्या काळानुसार आज एखादी सवय जीवनाचा भाग बनवण्यासाठी ५६ ते ६६ दिवसांचा कालावधी लागू शकतो. यामध्ये सातत्य राखणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे डॉ. नेने म्हणाले. तसेच, उत्तम आरोग्यासाठी संतुलित आहार, नियमित हालचाल, पुरेशी झोप, तणाव व्यवस्थापन व सकारात्मक दृष्टिकोन आणि सामाजिक संबंध हे पाच आधारस्तंभ प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजेत.
सध्या सोशल मीडिया आणि कृत्रिम बुद्धिमत्तेकडून (AI) मिळणाऱ्या वैद्यकीय माहितीवर आंधळेपणाने विश्वास न ठेवण्याचा सल्लाही त्यांनी दिला. कोरोना काळानंतर अनेकजण स्वतःला आरोग्यतज्ज्ञ समजू लागले आहेत, त्यामुळे ठोस पुराव्याशिवाय कोणत्याही इन्फ्लुएन्सरच्या दाव्यांवर विसंबून राहू नये. वजन कमी करण्यासाठी केवळ एक तास व्यायाम पुरेसा नसून दिवसभर सक्रिय राहणे आवश्यक आहे. यासोबतच मोबाईल, ओटीटी आणि सोशल मीडियाचा वापर मर्यादित ठेवणेही फायदेशीर ठरते, असे ते म्हणाले.
'21 Days to Good Health' या पुस्तकातील २१ दिवस ही केवळ निरोगी जीवनशैलीची सुरुवात असल्याचे ते सांगतात. लोक शेअर बाजार आणि बँकेत मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करतात, मात्र स्वतःच्या आरोग्यासाठी गुंतवणूक करत नाहीत. केवळ दीर्घायुष्य लाभण्यापेक्षा ते निरोगी असण्याला अधिक महत्त्व असून, आजारांवर प्रतिबंधात्मक उपाय करणे हेच आपले ध्येय असल्याचे डॉ. श्रीराम नेने यांनी नमूद केले.
📌 महत्वाच्या बातम्या
- नाना पाटेकर-तनुश्री दत्ता वाद: अमिताभ बच्चन यांच्या ‘त्या’ प्रतिक्रियेवर तनुश्रीने व्यक्त केला होता संताप
- आई शाळेत उशिरा आली अन् तो क्रिकेटपटू बनला; रणजीमध्ये ९ बळी घेणाऱ्या तनय त्यागराजनची रंजक कहाणी
- भुवनेश्वर कुमारनंतर आता मोहम्मद शमीचं टीम इंडियात कमबॅक होणार? रणजीतील दमदार कामगिरीनंतर एमएसके प्रसाद यांची शिफारस





