प्रतिनिधी, 13 ऑक्टोबर: हिंदी चित्रपटसृष्टीत अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी आपल्या एकाच भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर कायमची छाप सोडली. यापैकीच एक नाव म्हणजे जस्मिन धुन्ना. १९८८ साली आलेल्या रामसे ब्रदर्सच्या 'वीराना' या हॉरर चित्रपटातून ती रातोरात लोकप्रिय झाली. मात्र, प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचल्यानंतर तिने अचानक बॉलिवूडपासून कायमचे दूर जाण्याचा निर्णय घेतला.
जस्मिन धुन्ना हिने १९७९ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'सरकारी मेहमान' या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. या चित्रपटात तिने अभिनेते विनोद खन्ना यांच्यासोबत काम केले होते. पदार्पणाच्या वेळी ती अवघ्या १३ वर्षांची असल्याचे सांगितले जाते. मात्र, या सुरुवातीच्या चित्रपटातून तिला फारशी ओळख मिळाली नाही.
तिला खरी लोकप्रियता 'वीराना' चित्रपटाने दिली. या हॉरर चित्रपटात तिने एका दुष्ट आत्म्याच्या प्रभावाखाली असलेल्या महिलेची व्यक्तिरेखा साकारली होती. तिचा लूक, चेहऱ्यावरील हावभाव आणि पडद्यावरील वावर यामुळे ती प्रचंड चर्चेत आली. या चित्रपटामुळे जस्मिन धुन्ना हॉरर चित्रपटांमधील एक लक्षवेधी चेहरा बनली आणि तिच्याकडे नव्या चित्रपटांच्या अनेक ऑफर्स येऊ लागल्या.
मात्र, चित्रपट निर्माते दीपक रामसे यांनी एका मुलाखतीत दिलेल्या माहितीनुसार, जस्मिनने त्यानंतर चित्रपटांमध्ये काम करण्यास स्पष्ट नकार दिला. तिने तुलसी रामसे आणि श्याम रामसे यांना आपण यापुढे काम करणार नसल्याचे सांगितले होते. आपला फोन नंबर इतर कोणत्याही निर्मात्यांना दिला जाऊ नये, अशी विनंतीही तिने केली होती. निर्मात्यांनी तिच्या या निर्णयाचा आदर करत तिच्यावर कोणताही दबाव आणला नाही.
काही काळासाठी जस्मिन धुन्नाचे नाव अंडरवर्ल्डशीही जोडले गेले होते, पण या चर्चांना कधीच अधिकृत दुजोरा मिळाला नाही. कालांतराने ती प्रसिद्धीच्या झोतातून पूर्णपणे दूर गेली. गेल्या अनेक दशकांपासून ती चित्रपटसृष्टीपासून दूर असून ती सध्या कुठे आहे आणि काय करते, याबाबत कोणतीही ठोस सार्वजनिक माहिती उपलब्ध नाही.





