प्रतिनिधी, 13 ऑक्टोबर: शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावलेल्या महत्त्वाच्या बैठकांना ते गैरहजर राहिल्याने या चर्चा सुरू झाल्या आहेत.
दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'वर्षा' निवासस्थानी दुष्काळ आढावा बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांना बोलावण्यात आले होते, परंतु ते या बैठकीला गैरहजर राहिले.
त्यानंतर आज आयोजित करण्यात आलेल्या कचरा आढावा बैठकीलाही एकनाथ शिंदे उपस्थित राहिले नाहीत. मात्र, त्याच वेळी त्यांच्या 'नंदनवन' निवासस्थानी पत्रकार परिषद असल्याने ते गैरहजर राहिल्याचे कारण यावर देण्यात आले आहे.
या सलग गैरहजेरीमुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. भाजपकडून एकनाथ शिंदे यांच्याकडे दुर्लक्ष करून त्यांना जाणीवपूर्वक डावलले जात आहे का आणि भाजप त्यांची नाराजी दूर करणार का, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.






