प्रतिनिधी, 13 ऑक्टोबर: कॉकरोच जनता पार्टीचे नेते अभिजीत दीपके यांनी दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. १० ऑक्टोबर रोजी विमानातून अटक केल्यानंतर आपल्याला आणि सहकाऱ्यांना २४ तास अज्ञातस्थळी बेकायदेशीरपणे डांबून ठेवल्याचा खळबळजनक दावा दीपके यांनी माध्यमांशी बोलताना केला.
अटकेनंतर आमचे मोबाईल काढून घेण्यात आले होते आणि कुणाशीही संपर्क होऊ दिला नाही. आपण नेमके कुठे आहोत, याची माहिती स्वतःला तसेच वकिलांनाही देण्यात आली नव्हती, असा धक्कादायक खुलासा त्यांनी केला आहे.
१० ऑक्टोबर रोजी नवी दिल्लीतील आंदोलनावेळी पोलिसांनी दीपके यांना विमानात घुसून अटक केली होती. या कारवाईवर संताप व्यक्त करताना ते म्हणाले की, "विमानातून अटक करायला मी काय दहशतवादी किंवा गुंड आहे का?" तसेच अमेरिकेच्या सांगण्यावरून काहींना सोडले जाते आणि आम्हाला मात्र अटक केली जाते, असा आरोपही त्यांनी केला.
पोलिसांकडून मानसिक छळ झाल्याचे सांगताना दीपके यांनी कुटुंबाबाबत एक गंभीर बाब मांडली. आजीचे निधन झालेले असतानाही पोलिसांनी मध्यरात्री आई-वडिलांना फोन करण्यासाठी दबाव टाकला. मी आता अनेक दिवसांसाठी तुरुंगात जाणार आहे, असे सांगून कुटुंबाला मानसिक त्रास देण्याचा पोलिसांचा हेतू होता, असे दीपके म्हणाले.
दरम्यान, सीजेपीचे नेते आशुतोष रांका, सौरव दास आणि अजिंक्य शिंदे यांनी आज जंतरमंतरवर तिरंगा फडकवला. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. यावर प्रतिक्रिया देताना दीपके म्हणाले की, सरकारविरोधात बोलणाऱ्यांना अटक केली जाते. जंतरमंतर कोणाच्या घरची मालमत्ता नसून तिथे आंदोलन करण्याचा आमचा अधिकार आहे.





