प्रतिनिधी, 13 ऑक्टोबर: जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरच्या राजकारणात सध्या कमालीची कटुता निर्माण झाली असून, येथील आरोप-प्रत्यारोपांची पातळी आता अत्यंत व्यक्तिगत स्वरूपाची झाली आहे. शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांनी थेट एकनाथ खडसे यांचे दिवंगत पुत्र निखिल खडसे यांच्या मृत्यूवरून अत्यंत गंभीर भाष्य करत खळबळ उडवून दिली आहे.
एकनाथ खडसे यांनी आमदार पाटील यांच्या मुलीवर निशाणा साधला होता. 'पाटील यांची मुलगी नगराध्यक्ष असली तरी ती एकही दिवस नगरपंचायतीत फिरकत नाही', असा आरोप खडसेंनी केला होता. यावरून संतप्त झालेल्या चंद्रकांत पाटील यांनी खडसेंना थेट इशारा दिला. "माझ्या मुलीविषयी का बोलतोय? खडसे वैफल्यग्रस्त झाला आहे. तुला पण मुली आहेत, जरा भान ठेव. याद राखा कुटुंबावर जात असाल तर घराबाहेर पडू देणार नाही," असा सज्जड दम पाटील यांनी भरला. एवढ्यावरच न थांबता त्यांनी निखिल खडसेंच्या मृत्यूचा संदर्भ देत विचारले की, "तुमच्या मुलाने निखिलने का जीवन संपवलं? त्याने असं काय पाहिलं होतं की त्याला आयुष्य संपवावं लागलं? एका मंत्र्याने म्हटलं होतं की जर मी गौप्यस्फोट केला, तर खडसेंना तोंड दाखवायला जागा उरणार नाही."
या गंभीर आरोपांनंतर एकनाथ खडसे यांनीही आमदार पाटील यांना जशास तसे उत्तर दिले आहे. "आमदारांनी निखिलच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करावी," असे खुले आव्हान खडसेंनी दिले आहे. तसेच आपल्या मूळ आरोपावर ठाम राहत, "नगराध्यक्ष कुठे आहेत हे सांगा आणि पाचशे रुपये बक्षीस मिळवा," असा टोलाही त्यांनी लगावला.
पुढे बोलताना खडसेंनी चंद्रकांत पाटील यांनाही वैयक्तिक पातळीवर इशारा दिला. "आमदार सध्या घरातील समस्यांमुळे उद्विग्न अवस्थेत आहेत. त्यांच्या कुटुंबाविषयी माझ्याकडेही बरीच माहिती आहे. जर तुम्ही बाकीच्या गोष्टी काढणार असाल, तर मीदेखील सगळ्या गोष्टी बाहेर काढेन," असा पलटवार खडसेंनी केला.
या संपूर्ण वादाची पार्श्वभूमी पाहता, गेल्या काही दिवसांपासून दोन्ही गटांत तीव्र संघर्ष सुरू आहे. दोन आठवड्यांपूर्वीच केंद्रीय मंत्री आणि खडसेंच्या सून रक्षा खडसे यांनीही पाटलांना लक्ष्य केले होते. जिल्हा बँक 'खडसे मुक्त' करण्याच्या पाटलांच्या घोषणेवर बोलताना रक्षा खडसे म्हणाल्या होत्या की, "जिल्हा बँक खडसे मुक्त करणे हे आमदार चंद्रकांत पाटलांच्या हातात नाही, ते सभासद ठरवतील. मला निवडणुकीत उभं राहायचं असेल तर मी उभं राहणार, ते ठरवू शकत नाहीत की मी उभं राहायचं की नाही."






