प्रतिनिधी, 12 ऑक्टोबर: राज्यातून पावसाने दडी मारल्याने सरकारने बहुतांश तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. अशातच आता उन्हाचा कडाका वाढू लागल्याने वातावरणात मोठा बदल पाहायला मिळत असून नागरिक नव्या चिंतेत पडले आहेत.
मुंबई, ठाणे आणि पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातच तापमानाचा पारा लक्षणीयरीत्या वर गेला आहे. आज सुट्टीचा दिवस असल्याने मोठ्या संख्येने घराबाहेर पडलेल्या नागरिकांना या ‘ऑक्टोबर हिट’चे तीव्र चटके सहन करावे लागले. सांताक्रूझ येथील हवामान केंद्रावर आज ३८ अंश सेल्सिअस इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद झाली. विदर्भ आणि मराठवाड्यातही अशीच तापदायक परिस्थिती निर्माण झाली असून सामान्यांचे मोठे हाल होत आहेत.
सध्याच्या या वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान, आता मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे या परतीच्या प्रवासात तरी वरुणराजा बरसेल, अशी आशा सर्वसामान्यांना लागून राहिली आहे. हा पाऊस पडल्यास रब्बी हंगामातील पेरण्यांना बळ मिळेल आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, अशी भावना व्यक्त होत आहे.






