प्रतिनिधी, 31 ऑक्टोबर: भारतीय संघ आणि बीसीसीआयने आगामी २०२७ च्या वन-डे वर्ल्ड कपच्या दृष्टीने आत्तापासूनच तयारी सुरू केली आहे. संघाचा समतोल राखण्यासाठी विविध खेळाडूंना वन-डे क्रिकेटमध्ये आजमावून पाहिले जात आहे. एकीकडे तब्बल चार वर्षांनंतर ३६ वर्षीय भुवनेश्वर कुमारचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे, तर दुसरीकडे न्यूझीलंडमधील मालिकेसाठी अनुभवी अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला संधी देण्यात आलेली नाही. त्यामुळे बीसीसीआयने जडेजासाठी आगामी वर्ल्ड कपचे दरवाजे बंद केले आहेत का, अशी चर्चा रंगली असून यावर भारताचा माजी फलंदाज चेतेश्वर पुजाराने महत्त्वाचे भाष्य केले आहे.
वृत्तसंस्था आयएएनएसच्या माहितीनुसार, जिओस्टारशी संवाद साधताना पुजाराने जडेजाच्या भविष्यावर आपले मत मांडले. संघात अक्षर पटेलला दुसरा फिरकी अष्टपैलू म्हणून पसंती मिळत असल्याने जडेजाच्या ५० षटकांच्या क्रिकेटमधील संधी कमी झाल्याचे त्याने सुचवले आहे. याबाबत पुजारा म्हणाला, “मला असे वाटते, कारण जर तुम्हाला जडेजाला वन-डे क्रिकेटमध्ये ठेवायचे असते, तर त्याची निवड झाली असती. मला खात्री आहे की, त्याला याची कल्पना दिली गेली असेल की त्याची निवड कदाचित होणार नाही, कारण अक्षर पटेल हा वन-डे क्रिकेटमधील मुख्य अष्टपैलू खेळाडू आहे आणि त्याला अधिक संधी दिल्या जात आहेत.”
जडेजाच्या वयाचा मुद्दा उपस्थित करत पुजाराने निदर्शनास आणून दिले की, ३७ वर्षीय जडेजाला बीसीसीआयने केवळ कसोटीवर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना दिल्या असाव्यात. तो म्हणाला, “त्याच्या वयाकडे पाहता, मला वाटते की संघ व्यवस्थापनाने त्याला सांगितले असावे की तो आता फक्त कसोटी क्रिकेटचा भाग आहे. त्यामुळे त्याने तिथेच लक्ष केंद्रित करावे, आणि ते त्याच्याकडे व्हाईट-बॉल क्रिकेटसाठी पाहत नाहीत.” जडेजाने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आधीच निवृत्ती घेतली असल्याने, आता त्याला केवळ वन-डेसाठी निवडले जाण्याची शक्यता कमी असल्याचेही पुजाराने स्पष्ट केले. हे वक्तव्य खरे ठरल्यास जडेजा २०२७ च्या वन-डे वर्ल्ड कपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना दिसणार नाही.
मात्र, भारतीय संघातील दुखापतींचे सत्र पाहता जडेजा पूर्णपणे शर्यतीतून बाहेर पडलेला नाही, असेही पुजाराने सुचवले आहे. दुखापती हा खेळाचाच भाग असल्याने अक्षर पटेलच्या जागी संघ व्यवस्थापनाला पर्यायी खेळाडू तयार ठेवावा लागेल. यावर बोलताना पुजाराने स्पष्ट केले की, “सध्याचा रास्त प्रश्न हा आहे की: अक्षरनंतर आघाडीवर कोण आहे? सध्या अक्षर पटेल आघाडीवर आहे आणि त्याच्यानंतर जड्डू अजूनही तुमची इन्शुरन्स पॉलिसी आहे. वर्ल्ड कपपूर्वी जर अक्षर पटेलला काही झाले, तर रवींद्र जडेजा संघात येईल.”
📌 महत्त्वाच्या बातम्या
- उत्तम साहित्यासाठी लेखकांना अधूनमधून तुरुंगात पाठवा: ‘बोध कीर्तन’च्या प्रकाशनात संजय राऊतांचे विधान
- पंजाब विधानसभा निवडणूक: ‘आप’कडून ४० उमेदवारांची पहिली यादी जाहीर, भगवंत मान धुरीतून लढणार
- ‘रोहित पवार लबाड लांडगा, राजकारणातला कलंक’, उजनीतील डेटा सेंटरवरून भाजप आमदारांची सडकून टीका




