आयपीएल टीमची मालक काव्या मारन होणार रजनीकांत यांची सून; जाणून घ्या तिचे शिक्षण आणि संपत्ती

सनरायझर्स हैदराबादची सीईओ काव्या मारन आणि संगीतकार अनिरुद्ध रविचंद्रन यांचा विवाह ग्रीसमध्ये होणार असून, चेन्नईत ग्रँड रिसेप्शन आयोजित करण्यात आले आहे.

mahasatta

प्रतिनिधी, 17 ऑक्टोबर: आयपीएलमधील 'सनरायझर्स हैदराबाद' या संघाची सीईओ काव्या मारन लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. प्रसिद्ध संगीतकार अनिरुद्ध रविचंद्रन याच्याशी तिचे लग्न निश्चित झाले असून, यामुळे ती दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या कुटुंबाची सून होणार आहे. रजनीकांत यांची पत्नी लता या अनिरुद्धच्या मावशी आहेत. या हाय-प्रोफाईल विवाहसोहळ्याच्या चर्चेमुळे काव्याचे शिक्षण, तिची संपत्ती आणि कौटुंबिक पार्श्वभूमी जाणून घेण्याची चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

पिंकव्हिलाच्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, काव्या आणि अनिरुद्ध यांचा विवाह सोहळा ११ नोव्हेंबर रोजी ग्रीसमध्ये पार पडणार आहे. त्यानंतर २१ नोव्हेंबरला चेन्नईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ग्रँड रिसेप्शन आयोजित करण्यात येणार आहे. या रिसेप्शनच्या निमंत्रणाची बातमी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या 'एक्स' (X) वरील पोस्टनंतर अधिकृतपणे समोर आली. सन ग्रुपचे चेअरमन आणि काव्याचे वडील कलानिधी मारन व आई कावेरी मारन यांनी मुख्यमंत्र्यांच्या जुबली हिल्स येथील निवासस्थानी भेट देऊन त्यांना या चेन्नईतील रिसेप्शनचे निमंत्रण दिले.

काव्याच्या शिक्षणाबद्दल सांगायचे तर, इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार तिने तिचे पदवीपर्यंतचे शिक्षण चेन्नईच्या 'स्टेला मॅरिस कॉलेज'मधून पूर्ण केले आहे. त्यानंतर तिने युनायटेड किंगडममधील 'वॉरविक बिझनेस स्कूल'मधून (Warwick Business School) एमबीएची पदवी घेतली. शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने मीडिया आणि स्पोर्ट्स बिझनेस क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. सध्या ती सन ग्रुपच्या स्पोर्ट्स ऑपरेशन्सची जबाबदारी सांभाळते, ज्यामध्ये 'सनरायझर्स हैदराबाद' संघाचाही समावेश आहे. आयपीएल सामन्यांदरम्यान ती अनेकदा आपल्या संघाला प्रोत्साहन देताना स्टेडियममध्ये दिसते.

काव्या मारनच्या वैयक्तिक संपत्तीबाबत सध्या कोणतीही स्वतंत्र आणि अधिकृत माहिती उपलब्ध नाही. मात्र, फोर्ब्सच्या अहवालानुसार तिचे वडील कलानिधी मारन यांची एकूण संपत्ती २.६ अब्ज डॉलर (सुमारे २४,६२९.३४ कोटी रुपये) असल्याचा अंदाज आहे. कलानिधी मारन यांनी कौटुंबिक प्रकाशन व्यवसायापासून सुरुवात करत १९९२ मध्ये 'सन टीव्ही नेटवर्क'ची स्थापना केली. पाहता पाहता या नेटवर्कचा प्रादेशिक टेलिव्हिजनमध्ये मोठा विस्तार झाला. आज या नेटवर्कअंतर्गत एकूण ३७ चॅनेल्स असून ते देशातील सुमारे १४ कोटी लोकांपर्यंत पोहोचतात.

काव्याचा होणारा नवरा अनिरुद्ध रविचंद्रन हा दक्षिणेतील एक अत्यंत लोकप्रिय संगीतकार, गायक आणि निर्माता आहे. २०१२ मध्ये आलेल्या 'व्हाय धिस कोलावरी डी' या त्याच्या गाण्याने सर्वाधिक लोकप्रियता मिळवली आणि त्याचे नाव सर्वदूर पोहोचले. याशिवाय त्याने 'जेलर', 'लिओ', 'जवान', 'विक्रम' आणि 'मास्टर' यांसारख्या सुपरहिट चित्रपटांनाही संगीत दिले आहे, ज्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.

📌 महत्वाच्या बातम्या

MahaSatta News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या