प्रतिनिधी, 22 ऑक्टोबर: जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई पॅरा गेम्सदरम्यान एका भारतीय खेळाडूच्या लज्जास्पद कृत्यामुळे देशाची आणि खेळाडूंची मोठी बदनामी झाली आहे. भारतीय पॅरा जलतरणपटू मोहम्मद शम्स आलम शेख याने हॉटेलमधील एका महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
भारतीय पॅरा जलतरण संघाची जपानमधील 'नागोया फोर पॉइंट्स बाय शेराटन' हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी हाऊसकीपिंगचे काम करण्यासाठी एक महिला कर्मचारी शम्स आलमच्या खोलीत गेली होती. हॉटेल अधिकाऱ्यांनी केलेल्या दाव्यानुसार, तिथे या खेळाडूने तिच्यासोबत गैरवर्तन करत चुकीचा स्पर्श केला.
त्याने महिलेसमोर अश्लील हावभाव केले आणि तिच्यासोबत जबरदस्ती करण्याचाही प्रयत्न केला. या प्रकाराने घाबरलेल्या महिला कर्मचाऱ्याने तिथून पळ काढत आपल्या वरिष्ठांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर तातडीने पोलिसांना पाचारण करण्यात आले. जपानी पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याच्यावर न्यायालयात खटला चालवण्याची तयारी केली होती.
मात्र, यावेळी भारतीय अधिकारी आणि स्थानिक आयोजन समितीने या प्रकरणात तातडीने मध्यस्थी केली. भारतीय पथकाला संबंधित महिला कर्मचाऱ्याची लेखी माफी मागण्यास सांगण्यात आले आणि या खेळाडूला त्वरित भारतात परत पाठवण्याचे निर्देश दिले गेले. त्यानुसार, रात्री त्याला दुसऱ्या हॉटेलमध्ये हलवण्यात आले आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच भारतात पाठवून देण्यात आले.
या संपूर्ण प्रकरणामुळे खेळावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी भारतीय अधिकाऱ्यांचा बहुमूल्य वेळ पोलीस आणि हॉटेल प्रशासनासोबतच्या चर्चेत वाया गेला. या गंभीर प्रकाराची दखल घेत भारतीय पॅरालिम्पिक समिती मोहम्मद शम्स आलम शेख याच्यावर आजीवन बंदी घालण्याच्या तयारीत असून त्याच्यावर भारतात मोठी कारवाई केली जाणार आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- विनोद कांबळी रडले, राडा झाला अन्…; रोहित शर्माने सांगितला क्रिकेटर बनण्यामागचा तो किस्सा
- काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंदर ग्रीसमध्ये नाही, तर चेन्नईत अडकणार विवाहबंधनात; मित्राचा मोठा खुलासा
- न्यूझीलंडला भिडण्यासाठी रोहित शर्माची जोरदार तयारी; सरावाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल




