मुंबई, 13 नोव्हेंबर: आधीच महागाईचा सामना करणाऱ्या सर्वसामान्यांच्या खिशाला आता दुधाच्या दरवाढीमुळे आणखी कात्री लागणार आहे. राज्यातील गायीच्या आणि म्हशीच्या दुधाचे दर प्रति लिटरमागे ४ रुपयांनी वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय दुग्धजन्य पदार्थांच्या किमतीही १० टक्क्यांनी महागणार आहेत.
पुण्याच्या कात्रज डेअरी कार्यालयात 'दूध उत्पादक व व्यावसायिक कल्याणकारी संघा'ची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील जवळपास ४५ सहकारी आणि खासगी दूध ब्रँडच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत दरवाढीवर शिक्कामोर्तब झाले. हिरवा आणि सुका चारा, पशुखाद्य, पॅकेजिंग तसेच मालवाहतुकीच्या खर्चात झालेली मोठी वाढ दरवाढीला कारणीभूत ठरली आहे. यासोबतच डिझेल आणि साखरेचे वाढलेले दर, डीलर रेट आणि बाहेरील ब्रँड्सचे वाढते आक्रमण या कारणांमुळे दरवाढ करणे अपरिहार्य झाल्याचे दूध उत्पादकांनी स्पष्ट केले आहे.
राज्यातील या निर्णयाआधीच १२ नोव्हेंबरपासून अमूलने दरवाढ लागू केली आहे. अमूल 'ताजा टोन्ड' दुधाच्या दरात दोन रुपये, तर 'अमूल गोल्ड'च्या दरात चार रुपयांची वाढ झाली आहे. अमूलच्या पावलावर पाऊल ठेवत मदर डेअरीने देखील आपल्या दुधाच्या किमती दोन ते चार रुपयांनी वाढवल्या आहेत.
दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांमुळे चर्चेत असलेल्या 'गोकुळ' दूध संघानेही दरवाढीचे स्पष्ट संकेत दिले आहेत. गोकुळचे नवे अध्यक्ष राजेश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी होणाऱ्या नूतन कार्यकारिणीच्या पहिल्याच बैठकीत गोकुळच्या दूध दरवाढीबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
📌 महत्त्वाच्या बातम्या
- एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताचा दुसरा सर्वात मोठा पराभव, न्यूझीलंडकडून २४४ धावांनी धुव्वा
- डिसेंबरमध्ये गृहकर्ज आणखी महागणार? आरबीआयकडून रेपो रेट वाढवण्याची तज्ज्ञांची शक्यता
- राहुल गांधींच्या फोन टॅपिंगच्या दाव्याला सपकाळ, राऊतांचा दुजोरा; मोदी-शाहांवर हल्लाबोल




