प्रतिनिधी, 31 ऑक्टोबर: पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी (Punjab Election 2027) आम आदमी पार्टीने आपली पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत ४० उमेदवारांची घोषणा करण्यात आली असून, सर्व विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री भगवंत मान हे धुरी मतदारसंघातून पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. तसेच, सध्या तुरुंगात असलेले मंत्री संजीव अरोरा यांना लुधियाना पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे.
या पहिल्या यादीमध्ये राज्याचे अर्थमंत्री हरपाल चीमा यांचे नाव वगळण्यात आले आहे. संगरूर जिल्ह्यातील तुरबंजरा येथे घडलेल्या गुलजार आत्महत्या प्रकरणात चीमा यांचे नाव समोर आले होते. मात्र, त्यांच्या जागी पक्षाने अद्याप नव्या उमेदवाराची घोषणा केलेली नाही. सध्याच्या पंजाब विधानसभेचा कार्यकाळ मार्च २०२७ मध्ये पूर्ण होत आहे. एकूण ११७ पैकी ९४ जागांवर सध्या 'आप'चे आमदार विराजमान आहेत.
या यादीत चार माजी मंत्र्यांना त्यांच्या जुन्याच मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे. ब्रह्म शंकर शर्मा जिम्पा यांना होशियारपूरमधून उमेदवारी मिळाली आहे. ते १६ मार्च २०२२ रोजी मंत्री बनले होते आणि त्यांच्याकडे महसूल, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन, पाणीपुरवठा व स्वच्छता ही खाती होती. मात्र, २३ सप्टेंबर २०२४ च्या मंत्रिमंडळ फेरबदलात त्यांना पदावरून हटवण्यात आले होते. तसेच, स्थानिक स्वराज्य संस्था आणि संसदीय कामकाज खाते सांभाळलेले डॉ. इंदरबीर सिंग निज्जर यांना अमृतसर दक्षिणमधून तिकीट मिळाले आहे. मार्च २०२२ मध्ये मंत्री बनलेल्या निज्जर यांनी मे २०२३ मध्ये वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिला होता.
याशिवाय, स्थानिक स्वराज्य संस्था आणि संसदीय कामकाज विभागाची जबाबदारी सांभाळलेले बलकार सिंग यांना कर्तारपूरमधून पुन्हा उमेदवारी मिळाली आहे. मे २०२३ मध्ये मंत्री झालेल्या सिंग यांना २३ सप्टेंबर २०२४ च्या फेरबदलात हटवण्यात आले. कृषी, पंचायत आणि ग्रामीण विकास व नंतर अनिवासी भारतीय व्यवहार मंत्री राहिलेल्या कुलदीप सिंग धालीवाल यांना अजनालामधून तिकीट मिळाले आहे. ते १९ मार्च २०२२ रोजी मंत्री बनले होते आणि ३ जुलै २०२५ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ फेरबदलात त्यांना पदावरून दूर करण्यात आले.
पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. मागील पाच वर्षांतील विकासकामांमुळे पंजाबची जनता खूश असून भगवंत मान यांनी पुन्हा मुख्यमंत्री व्हावे अशी लोकांची इच्छा असल्याचे ते म्हणाले. शिक्षण, आरोग्य, वीज, पाणी तसेच शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी तळागाळात केलेल्या कामांमुळे राज्यात सकारात्मक वातावरण आहे. भगवंत मान यांचे काम, त्यांचे पंजाबवरील प्रेम आणि राज्याच्या प्रगतीच्या मुद्द्यावर पक्ष ही निवडणूक लढवेल, असे सिसोदिया यांनी स्पष्ट केले.
तुरुंगात असलेले उमेदवार संजीव अरोरा यांच्याबाबत बोलताना सिसोदिया यांनी भाजपवर निशाणा साधला. भाजप सध्या केवळ आरोप करून निवडणुका लढवत आहे. अरोरा हे राज्यात गुंतवणूक आणण्याचे मोठे काम करत होते, मात्र याची धास्ती घेऊन भाजपने त्यांना एका खोट्या प्रकरणात अटक केली असल्याचा आरोप सिसोदिया यांनी केला.
📌 महत्त्वाच्या बातम्या
- ‘रोहित पवार लबाड लांडगा, राजकारणातला कलंक’, उजनीतील डेटा सेंटरवरून भाजप आमदारांची सडकून टीका
- ठाकरेंसोबत बंद दाराआड काय चर्चा झाली? देवेंद्र फडणवीसांनी केला मोठा खुलासा
- रवींद्र धंगेकरांवर भाजप नेते नवनाथ बन यांची एकेरी शब्दांत टीका, म्हणाले ‘बारा पक्ष फिरलेला माकडछाप’




