प्रतिनिधी, 21 ऑक्टोबर: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) २०२७ च्या १९ वर्षांखालील (U19) महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक अधिकृतरीत्या जाहीर केले आहे. ही जागतिक स्पर्धा बांगलादेश आणि नेपाळ या दोन देशांमध्ये संयुक्तपणे आयोजित केली जाणार आहे. २१ जानेवारी ते ६ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत १६ संघांमध्ये एकूण ४१ सामने खेळवले जातील.
या स्पर्धेतील १६ संघांची प्रत्येकी चार संघांच्या चार गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. दोन वेळचा गतविजेता भारतीय संघ 'अ' गटात असून, यात वेस्ट इंडिज, आयर्लंड आणि यजमान नेपाळचा समावेश आहे. चित्तगोंग, सिल्हेट आणि काठमांडू येथील चार मैदानांवर सर्व सामने पार पडतील. आशिया खंडातील मैदानांवरील परिस्थिती भारतासारखीच असल्याने भारतीय संघाला याचा विशेष फायदा मिळण्याची शक्यता आहे.
स्पर्धेतील 'ब' गटात पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि सामोआ या संघांना स्थान देण्यात आले आहे. 'क' गटात ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, नायजेरिया आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) आहेत. तर 'ड' गटात इंग्लंड, श्रीलंका, अमेरिका आणि स्कॉटलंड या संघांचा समावेश आहे.
उद्घाटन दिवशी, २१ जानेवारी रोजी चार सामने खेळवले जाणार आहेत. सकाळी बांगलादेशचा सामना युएईशी, तर दुपारी मागील पर्वातील उपविजेत्या ऑस्ट्रेलियाची लढत नायजेरियाशी होईल. याच दिवशी काठमांडू येथील अप्पर मुलपानी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर श्रीलंका आणि स्कॉटलंड आमनेसामने येतील, तर इंग्लंडचा सामना अमेरिकेशी होईल.
गतविजेता भारतीय संघ २२ जानेवारी रोजी काठमांडू येथील टीयू आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर वेस्ट इंडिजविरुद्ध खेळून आपल्या विजेतेपदाच्या मोहिमेची सुरुवात करेल. त्याच दिवशी यजमान नेपाळचा सामना आयर्लंडशी, न्यूझीलंडचा सामना सामोआशी (चित्तगोंगमध्ये) आणि दक्षिण आफ्रिकेचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. गट फेरीचे सामने २६ जानेवारीपर्यंत चालतील.
गट फेरीनंतर पात्र ठरणारे संघ सुपर सिक्स टप्प्यात प्रवेश करतील. या टप्प्यात सर्व सहा संघांचे दोन गट केले जातील आणि प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. ४ फेब्रुवारी रोजी बीर श्रेष्ठ शहीद फ्लाइट लेफ्टनंट मतिउर रहमान क्रिकेट स्टेडियमवर उपांत्य फेरीचे सामने रंगतील, ज्यासाठी ५ फेब्रुवारी हा राखीव दिवस असेल.
स्पर्धेचा अंतिम सामना ६ फेब्रुवारी रोजी खेळवला जाईल. हा सामना स्थानिक वेळेनुसार दुपारी १:३० वाजता आणि भारतीय प्रमाण वेळेनुसार (IST) दुपारी १:०० वाजता सुरू होईल. अंतिम लढतीसाठी ७ फेब्रुवारी हा राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.
या स्पर्धेबाबत आयसीसीचे सीईओ संजोग गुप्ता यांनी एका निवेदनात सांगितले की, १९ वर्षांखालील टी-२० विश्वचषक महिला क्रिकेटच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावतो. यामुळे तरुण खेळाडूंना सर्वोच्च स्तरावर खेळण्याची आणि जागतिक अनुभव मिळवण्याची संधी मिळते. बांगलादेश आणि नेपाळमध्ये एकत्र येणारे १६ संघ महिला क्रिकेटमधील वाढत्या प्रतिभेची खोली दर्शवतील आणि यातून प्रस्थापित तसेच उदयोन्मुख देशांतील खेळाडूंना मोठी संधी मिळेल.
📌 महत्वाच्या बातम्या
- वैभव सूर्यवंशीवर अन्याय? माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने भारतीय संघाला सुनावले खडेबोल
- न्यूझीलंडविरुद्ध वैभव सूर्यवंशीला संधी मिळणार? कॅप्टन श्रेयस अय्यरने दिले स्पष्ट उत्तर
- माजी क्रिकेटपटू केदार जाधवचा RSS गणवेशातील फोटो व्हायरल; विजयादशमीच्या पथसंचलनात सहभाग




