प्रतिनिधी, 21 ऑक्टोबर: 'इंडियन आयडॉल'सारख्या लोकप्रिय रिॲलिटी शोमध्ये आपल्या आवाजाची जादू दाखवणारा पुण्याचा पराशर जोशी आता थेट क्रिकेटच्या मैदानावर अंपायरच्या भूमिकेत दिसणार आहे. बीसीसीआय (BCCI) आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया यांनी आयोजित केलेल्या एका विशेष पंच विनिमय कार्यक्रमाचा भाग म्हणून पराशर आता ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर पंचगिरी करणार आहे.
सध्या सुरू असलेल्या रणजी करंडक हंगामादरम्यान दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डांनी हा नवा पंच विनिमय उपक्रम सुरू केला आहे. या अंतर्गत ऑस्ट्रेलियन पंच बेन ट्रेलोअर हे भारतात दोन रणजी सामन्यांमध्ये पंचांची भूमिका बजावत आहेत, तर भारताचे अनुभवी पंच पराशर जोशी यांना अंपायरिंगसाठी ऑस्ट्रेलियाला पाठवण्यात आले आहे.
मूळच्या पुणेकर असलेल्या पराशर यांना सुरुवातीपासूनच संगीताची प्रचंड आवड होती. गायन क्षेत्रात नाव कमावण्यासाठी त्यांनी मोठी धडपड केली. सुरुवातीची सलग तीन वर्षे त्यांना ऑडिशन्समध्ये केवळ नकारच मिळाला. मात्र, अपयशाने न खचता चौथ्या वर्षी त्यांनी पुन्हा प्रयत्न केला आणि २००८ साली 'इंडियन आयडॉल सीझन ४' च्या पियानो फेरीपर्यंत मजल मारली. त्यानंतर मात्र ते या शोमधून बाहेर पडले.
संगीतासोबतच पराशर यांचे खेळाशीही अत्यंत घनिष्ठ नाते राहिले आहे. सुरुवातीला त्यांनी क्लब स्तरावर क्रिकेट खेळले. मात्र, नंतर खेळाच्या नियमांचा सखोल अभ्यास करून त्यांनी पंचगिरीमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला. क्रिकेट अंपायरिंगच्या क्षेत्रात प्रवेश केल्यापासून त्यांनी झपाट्याने प्रगती केली असून, आता त्यांच्या या प्रवासाने थेट ऑस्ट्रेलिया गाठली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- IND vs NZ: ‘कारणे देण्यापेक्षा विजयाचा मार्ग शोधा’; मालिकेपूर्वी कर्णधार श्रेयस अय्यरचा संघाला स्पष्ट संदेश
- स्मृती मानधना आणि हरमनप्रीत कौरमध्ये वाद? सामन्यानंतर हस्तांदोलन टाळल्याचा व्हिडीओ व्हायरल
- आगरकर OUT प्रज्ञान ओझा IN होताच मोहम्मद शमीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, ‘जर कोणी चुकीचं केलं…’




