प्रतिनिधी, 20 ऑक्टोबर: अजित आगरकर यांचा कार्यकाळ संपल्यानंतर बीसीसीआयने (BCCI) पुरुष निवड समितीची सूत्रे आता माजी फिरकीपटू प्रज्ञान ओझा यांच्याकडे सोपवली आहेत. ओझा यांच्या नेतृत्वाखाली माजी फिरकीपटू रमेश पोवार यांची निवड समितीचे नवीन सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
मुख्य निवडकर्त्याच्या (चीफ सिलेक्टर) पदासाठी माजी क्रिकेटपटू वसीम जाफर हे जास्त प्रबळ दावेदार मानले जात होते. विद्यमान निवड प्रक्रियेनुसार, ज्या झोनच्या सदस्याने सर्वाधिक कसोटी सामने खेळले आहेत, तो अध्यक्षपदाचा दावेदार मानला जातो. जाफर यांनी ३१ कसोटी सामने खेळले आहेत, तर प्रज्ञान ओझा यांनी केवळ २४ कसोटी सामने खेळले आहेत.
जाफर यांनी पदासाठी अर्ज केला होता आणि त्यांचा कसोटी अनुभवही जास्त होता. मात्र तरीही त्यांच्याऐवजी ओझा यांच्याकडे हे पद का सोपवण्यात आले, असा प्रश्न उपस्थित होत होता. आता केवळ कसोटी सामन्यांचा आकडा हा नियुक्तीसाठी अंतिम निकष मानला जात नसल्याचे समोर आले आहे. क्रिकेट सल्लागार समिती आणि बीसीसीआयच्या अंतर्गत प्रक्रियेतून हा निर्णय घेण्यात आला आहे. या सल्लागार समितीमध्ये अशोक मल्होत्रा आणि जतीन परांजपे यांचा समावेश आहे.
प्रज्ञान ओझा यांना बीसीसीआयच्या अंतर्गत कमिटीमध्ये मोठे समर्थन होते. ओझा यांनाच निवड समितीचे अध्यक्ष बनवावे, असे बीसीसीआयमधील अनेकांचे ठोस मत होते आणि याच कारणामुळे जाफर यांच्याऐवजी त्यांची या पदावर निवड करण्यात आली. तसेच नव्याने निवड झालेले रमेश पोवार यांच्याकडे प्रशिक्षणाचा अनुभव असून, त्यांनी महिला संघाला आशिया कप आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदके मिळवून दिली आहेत.
दरम्यान, यापूर्वीचे चीफ सिलेक्टर अजित आगरकर यांचा कार्यकाळ फार चर्चेचा विषय ठरला होता. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने गेल्या काही वर्षांत तीन आयसीसी ट्रॉफी आणि अनेक मोठी विजेतेपदे जिंकली. मात्र, त्यांच्या काळात भारतीय संघात अनेक महत्त्वपूर्ण बदल झाले. विराट कोहली, रोहित शर्मा आणि रविचंद्रन अश्विन यांसारख्या खेळाडूंना निवृत्ती घ्यावी लागली होती, ज्यामुळे आगरकर यांना मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.
📌 महत्वाच्या बातम्या
- खासदार युसूफ पठाण यांच्यावर गुजरात सरकारची मेहरबानी, करोडो रुपयांची जमीन भेट
- WPL 2027 लिलावासाठी १४६ खेळाडूंची यादी जाहीर; २७ जागांसाठी कोचीमध्ये रंगणार चुरस
- रणजी करंडक २०२६-२७: चिन्मय सुतारने रचला इतिहास, ७७ वर्षांनंतर एका डावात झळकावल्या नाबाद ४०० धावा




