खासदार युसूफ पठाण यांच्यावर गुजरात सरकारची मेहरबानी, करोडो रुपयांची जमीन भेट

गुजरात सरकारने खासदार युसूफ पठाण यांना दिलासा देत कोट्यवधी रुपये किंमत असलेल्या ९७८ चौरस मीटरच्या भूखंड वाटपाला मंजुरी दिली आहे.

mahasatta

प्रतिनिधी, 20 ऑक्टोबर: माजी क्रिकेटपटू आणि विद्यमान खासदार युसूफ पठाण यांना गुजरात सरकारकडून मोठा दिलासा मिळाला आहे. कोट्यवधी रुपयांच्या एका भूखंडावरून सुरू असलेल्या २०१२ पासूनच्या वादात राज्य सरकारने पठाण यांच्या बाजूने निर्णय देत मोठी मेहरबानी केली आहे. या जागेचा वाद मिटेपर्यंत तिची विक्री थांबवण्यात आली होती.

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, हा भूखंड एकूण ९७८ चौरस मीटरचा आहे. सरकारच्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे की, यापैकी ५०० चौरस मीटर जागा पठाण यांना भेट म्हणून दिली जाईल, तर उर्वरित ४७८ चौरस मीटर जागा ५५ टक्के सवलतीच्या दरात दिली जाणार आहे. वडोदरा महानगरपालिकेने (VMC) यासंबंधीचा प्रस्ताव तयार करून स्थानिक समितीकडे पाठवला होता.

हा भूखंड 'टाऊन प्लॅनिंग स्कीम २२' अंतर्गत 'फायनल प्लॉट नंबर ९०' म्हणून ओळखला जातो. वीएमसीच्या समितीने या जागेच्या विक्रीसाठी प्रति चौरस मीटर २.१० लाख रुपये दर निश्चित केला होता. सध्या बाजारात या संपूर्ण भूखंडाची किंमत २०.५ कोटी रुपये इतकी आहे. मात्र, या प्रकरणाकडे भविष्यात एक उदाहरण म्हणून पाहिले जाऊ नये, असेही सरकारच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणाची सुरुवात २०१२ मध्ये झाली होती. त्यावेळी क्रिकेटपटू असल्याने पठाण यांनी सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करून वीएमसीकडे चिंता व्यक्त केली होती. त्यावेळी या जागेची किंमत ५.६ कोटी रुपये होती आणि ते संपूर्ण रक्कम देण्यास तयार होते. मात्र, या प्रक्रियेत गुजरात सरकारचा आदेश आवश्यक होता.

त्यानंतर २०१४ मध्ये नगरविकास विभागाने हा प्रस्ताव फेटाळून लावला होता. प्रस्ताव फेटाळल्यानंतर या भूखंडाला कुंपण घालण्यात आल्याचा आरोप महानगरपालिकेने केला होता. यावरून २०२४ मध्ये पठाण यांना अतिक्रमण हटवण्याबाबत नोटीस पाठवण्यात आली व हे प्रकरण थेट न्यायालयात पोहोचले. अखेर आता गुजरात सरकारकडून या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याची माहिती महानगरपालिकेचे अधिकारी अरुण महेश बाबू यांनी दिली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

MahaSatta News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या