प्रतिनिधी, 17 ऑक्टोबर: इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) २०२७ च्या हंगामासाठी होणाऱ्या मिनी ऑक्शनची तारीख आणि ठिकाण समोर आले आहे. हा लिलाव १६ डिसेंबर २०२६ रोजी गोव्यातील 'आयटीसी ग्रँड' या पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडणार आहे. क्रिकबझच्या वृत्तानुसार, बीसीसीआयच्या लॉजिस्टिक्स टीमने पाठवलेल्या एका व्हॉट्सॲप मेसेजद्वारे ही माहिती उघड झाली आहे.
लिलावाबाबत फ्रँचायझी मालक आणि सीईओ यांना अद्याप कोणताही अधिकृत ईमेल पाठवण्यात आलेला नाही. मात्र, संघांना प्रवासाचे बुकिंग आणि इतर लॉजिस्टिकल व्यवस्था करण्यासाठी हा व्हॉट्सॲप संदेश देण्यात आला आहे. या मेसेजनुसार, प्रत्यक्ष लिलावाआधी १५ डिसेंबर २०२६ रोजी एक माहिती सत्र आयोजित केले जाणार आहे. अनेक आयपीएल फ्रँचायझींनी हा संदेश मिळाल्याला क्रिकबझकडे दुजोरा दिला आहे. या तारखांमध्ये भविष्यात काही बदल होणार की नाही हे स्पष्ट नसले तरी, योग्य वेळी अधिकृत सूचना दिली जाण्याची शक्यता आहे.
मागील तीन आयपीएल लिलाव (२०२४, २०२५ आणि २०२६) अनुक्रमे दुबई, जेद्दाह आणि अबू धाबी यांसारख्या परदेशांतील शहरांमध्ये पार पडले होते. मात्र, अलिकडच्या काळात परदेशात झालेल्या स्पर्धांनंतर आता लिलावाचे ठिकाण पुन्हा भारतात हलवण्याची मंडळाची इच्छा असल्याचे बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी स्पष्ट केले आहे. आयपीएल मिनी ऑक्शनसारखा कार्यक्रम देशांतर्गत आयोजित करणे सोयीचे असते. असे असले तरी, डिसेंबर महिन्यात भारतात लग्नसराईचा काळ असल्याने योग्य ठिकाण शोधण्यात अडचणी येत होत्या.
दरम्यान, १६ डिसेंबर रोजी बंगळूरुमध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात एकदिवसीय सामनाही खेळवला जाणार आहे. त्यामुळे या सामन्यात खेळणाऱ्या काही खेळाडूंची लिलावासाठी बोली लागण्याची शक्यता आहे. एकाच दिवशी सामना आणि लिलाव असा 'डबल धमाका' क्रिकेट चाहत्यांना अनुभवायला मिळू शकतो.
📌 महत्वाच्या बातम्या
- महिला जयवर्धने यांची मुंबई इंडियन्समधून एक्झिट! नव्या हेड कोचसाठी ५ दिग्गजांची नावे शॉर्टलिस्ट
- काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंदर विवाहबंधनात? ग्रीसमध्ये पार पडणार लग्नसोहळा
- सुरुवातीच्या काळात विराट कोहली खूपच अहंकारी होता; एबी डिव्हिलियर्सचा मोठा खुलासा




