प्रतिनिधी, 17 ऑक्टोबर: पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या गोटात मोठे बदल पाहायला मिळत आहेत. आयपीएल २०२७ च्या पार्श्वभूमीवर मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या एक्झिटनंतर फ्रँचायझीने आता नव्या मुख्य प्रशिक्षकाच्या शोधासाठी वेगवान हालचाली सुरू केल्या असून, पाच दिग्गजांची नावे शॉर्टलिस्ट केली असल्याची माहिती समोर आली आहे.
मुख्य प्रशिक्षकपदाच्या या शर्यतीत दोन ऑस्ट्रेलियन दिग्गजांसह एकूण पाच जणांचा समावेश आहे. यामध्ये मायकल हसी, ॲरॉन फिंच, इंग्लंडचा माजी कर्णधार इऑन मॉर्गन, दक्षिण आफ्रिकेचा माजी यष्टीरक्षक मार्क बाउचर आणि एड्रियन बिरेल यांच्या नावावर विचार सुरू आहे. या पदासाठी रविवारी मुलाखत प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता असली तरी, मुंबई इंडियन्सकडून अद्याप कोणत्याही नावाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
संभाव्य दावेदारांपैकी 'मिस्टर क्रिकेट' अशी ओळख असलेल्या मायकल हसी यांना चेन्नई सुपर किंग्सच्या कोचिंग स्टाफमध्ये काम केल्यामुळे आयपीएलचा दांडगा अनुभव आहे. फलंदाजीतील सुधारणा आणि खेळाडूंशी समन्वय साधण्याचे त्यांचे कौशल्य मुंबईसाठी फायद्याचे ठरू शकते. तर, २०२१ मध्ये ऑस्ट्रेलियाला टी-२० विश्वचषक जिंकून देणाऱ्या ॲरॉन फिंचकडे आंतरराष्ट्रीय कर्णधारपदाचा अनुभव असून वरिष्ठ खेळाडूंसोबत काम करण्याची त्यांची चांगली क्षमता आहे. याशिवाय, २०१९ च्या एकदिवसीय विश्वचषकात इंग्लंडला विजेतेपद मिळवून देणारा इऑन मॉर्गन देखील या पदासाठी दावेदार आहे.
मार्क बाउचर यांनी यापूर्वीही मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली २०२३ आणि २०२४ च्या हंगामात संघाने खेळ केला. २०२३ मध्ये संघाने प्लेऑफ गाठले होते, मात्र २०२४ मधील कर्णधारपदातील बदल आणि संघाच्या कामगिरीवरून बरीच चर्चा झाली. त्यांच्याव्यतिरिक्त, दक्षिण आफ्रिका आणि आयर्लंड क्रिकेट संघांसोबत आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करण्याचा मोठा अनुभव असलेले एड्रियन बिरेल हेदेखील प्रशिक्षकपदाचे उमेदवार मानले जात आहेत.
महेला जयवर्धने यांनी मुंबई इंडियन्ससोबत दोन वेगवेगळ्या पर्वांमध्ये काम केले. त्यांच्या पहिल्या कार्यकाळात संघाने २०१७, २०१९ आणि २०२० मध्ये विजेतेपद पटकावले होते. ते २०२४ मध्ये पुन्हा मुख्य प्रशिक्षक म्हणून परतले. मात्र, गेल्या दोन हंगामात संघाला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. मुंबई इंडियन्सचा संघ २०२५ मध्ये चौथ्या तर २०२६ मध्ये नवव्या स्थानावर राहिला होता. आता नव्या प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली पुढील हंगामासाठी दमदार तयारी करण्याच्या प्रयत्नात फ्रँचायझी आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंदर विवाहबंधनात? ग्रीसमध्ये पार पडणार लग्नसोहळा
- सुरुवातीच्या काळात विराट कोहली खूपच अहंकारी होता; एबी डिव्हिलियर्सचा मोठा खुलासा
- दारूचं व्यसन आणि २६ दिवस रिहॅबमध्ये; युझवेंद्र चहलनं सांगितला घटस्फोटाचा कठीण काळ




