प्रतिनिधी, 17 ऑक्टोबर: क्रिकेट विश्वातील खेळाडूंच्या मैत्रीची नेहमीच चर्चा होत असते. यामध्ये किंग कोहली आणि एबी डिव्हिलियर्स यांची मैत्री सर्वात आघाडीवर असल्याचे मानले जाते. या दोन्ही दिग्गज खेळाडूंनी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (आरसीबी) संघासाठी अनेक सामने एकत्र खेळले आहेत. मात्र, सुरुवातीच्या काळात विराट कोहली अतिआत्मविश्वासू आणि अहंकारी वाटत असल्याचा मोठा खुलासा डिव्हिलियर्सने एका पॉडकास्टमध्ये केला आहे.
प्रखर गुप्ता यांच्या पॉडकास्टमध्ये संवाद साधताना डिव्हिलियर्सने विराटबद्दलची आपली पहिली प्रतिक्रिया मांडली. तो म्हणाला की, १९ ते २१ वर्षांचा असताना विराटमध्ये प्रचंड आत्मविश्वास होता. मात्र, अनेकदा त्याच्या या आत्मविश्वासाचा चुकीचा अर्थ काढला गेला. विशेष म्हणजे, आपल्या या मताशी स्वतः विराटही सहमत असेल, असेही डिव्हिलियर्सने यावेळी नमूद केले.
कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी स्वतःच्या क्षमतेवर विश्वास असणे आवश्यक असते. तरुण वयात विराटला स्वतःला सिद्ध करायचे होते, ज्यामुळे त्याचा हा आत्मविश्वास अधिक प्रकर्षाने दिसून येत होता, असे स्पष्टीकरण डिव्हिलियर्सने दिले.
वेळेसोबत आणि वयानुसार विराटच्या स्वभावात बदल होत गेले. तो एक व्यक्ती आणि क्रिकेटपटू म्हणून अधिक परिपक्व झाला. स्वतःला सिद्ध करण्यासाठीची त्याची धडपड जसजशी कमी झाली, तसतसा त्याचा स्वभाव अधिक संतुलित झाल्याचे निरीक्षण डिव्हिलियर्सने नोंदवले. तसेच, आपण हे सर्व वक्तव्य अगदी खेळीमेळीच्या वातावरणात करत असल्याचेही त्याने स्पष्ट केले.
📌 महत्वाच्या बातम्या
- दारूचं व्यसन आणि २६ दिवस रिहॅबमध्ये; युझवेंद्र चहलनं सांगितला घटस्फोटाचा कठीण काळ
- आयपीएल टीमची मालक काव्या मारन होणार रजनीकांत यांची सून; जाणून घ्या तिचे शिक्षण आणि संपत्ती
- आयपीएल २०२७ पूर्वी मुंबई इंडियन्सला मोठा धक्का; मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांचे पद सोडले




