तुकाराम मुंढेंचा मोठा दणका: छत्रपती संभाजीनगरातील KFC चा परवाना एफडीएकडून निलंबित, कामकाज बंदचे आदेश

छत्रपती संभाजीनगरमधील केएफसी उपाहारगृहात त्रुटी आढळल्याने अन्न परवाना निलंबित करण्यात आला असून तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वात एफडीएकडून राज्यभरात मोठी कारवाई सुरू आहे.

mahasatta

छत्रपती संभाजीनगर, 15 ऑक्टोबर: अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून राज्यभरात कारवायांचा धडाका सुरू केला आहे. या मोहिमेदरम्यान छत्रपती संभाजीनगरमधील बीड बायपास, शाहनूरवाडी परिसरातील 'सफायर फूड्स इंडिया लिमिटेड' संचलित केएफसी (KFC) उपाहारगृहाचा अन्न परवाना प्रशासनाने तात्काळ निलंबित केला आहे. या थेट कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

प्रशासनाने घेतलेल्या आकस्मिक तपासणीत केएफसीमध्ये अन्नपदार्थांच्या साठवणीसह अनेक त्रुटी समोर आल्या. उपाहारगृहात कच्चे आणि शिजवलेले अन्न, तसेच शाकाहारी व मांसाहारी अन्नपदार्थ वेगळे ठेवले नसल्याचे आढळले. याशिवाय परिसरात अस्वच्छता, तापमान नियंत्रणातील त्रुटी आणि कीटक नियंत्रणाच्या (पेस्ट कंट्रोल) नोंदी नसल्याचे उघडकीस आले. या सर्व त्रुटींची दुरुस्ती करून प्रशासनाकडून लेखी पुनर्स्थापना आदेश मिळेपर्यंत उपाहारगृहाचे कामकाज बंद ठेवण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

तुकाराम मुंढे यांच्या या कठोर कारवाईने भेसळखोरांचे धाबे दणाणले असून नागरिकांमध्ये त्यांची मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. याच दरम्यान त्यांच्या बदलीची चर्चाही रंगताना दिसत आहे. सध्या केवळ छत्रपती संभाजीनगरच नाही, तर राज्यभरात मोठ्या हॉटेलांवर एफडीएकडून शोधमोहीम सुरू असून कोणाचीही गय केली जात नाही.

दुसरीकडे नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजापुरातही अन्न व औषध प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. भाविकांना स्वच्छ, ताजे आणि दर्जेदार अन्न मिळावे यासाठी २० अन्नसुरक्षा अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. त्यांच्यामार्फत हॉटेल्स, खाद्यपदार्थांच्या हातगाड्या आणि तात्पुरत्या दुकानांची तपासणी केली जात आहे. तसेच बनावट औषध विक्री रोखण्यासाठी आणि औषध विक्री केंद्रांवर नजर ठेवण्यासाठी ५ औषध निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

MahaSatta News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या