अमित शाहंचे डोळे म्युझियममध्ये ठेवावेत; संजय राऊत यांची खोचक टीका

लाखोंच्या मोर्चात केवळ आठ हजार लोक दिसल्याचा दावा करणाऱ्या अमित शाहंचे डोळे म्युझियममध्ये ठेवावेत, असा खोचक टोला ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी लगावला आहे.

mahasatta

प्रतिनिधी, 15 ऑक्टोबर: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दृष्टी कमजोर झाली असून नेत्रदानानंतर त्यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजेत, अशी खोचक टीका ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली आहे. दिल्लीत दीड किलोमीटरच्या परिसरात निघालेल्या लाखोंच्या मोर्चात गृहमंत्र्यांना केवळ आठ हजार लोक दिसल्याचा दावा करत, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने त्यांच्या तपासणीसाठी तातडीने वैद्यकीय पथक पाठवावे, अशी मागणीही त्यांनी माध्यमांशी बोलताना केली.

देशात आणि राजधानी दिल्लीत लोकशाहीच्या मुद्द्यावरून मोठी आंदोलने सुरू असताना गृहमंत्री बऱ्याच काळाने समोर आल्याचे सांगत राऊत यांनी निशाणा साधला. अमित शाह इतके दिवस भूमिगत होते आणि आता प्रकट होऊन मोर्चात फक्त आठ हजार लोक असल्याचे सांगत आहेत. गृहमंत्री मानसिक दडपण, डिप्रेशन आणि निराशेने ग्रासले आहेत. जर केवळ आठ हजारांचाच मोर्चा होता, तर रस्त्यावर अडीच लाख पोलीस का उतरवले? तसेच गृहमंत्र्यांच्या घराचा परिसर प्रतिबंधित का केला आणि जंतरमंतरला टाळं का लावलं, असा सवाल त्यांनी विचारला.

भाजप २०२९ मध्ये पुन्हा विजयी होईल या अमित शाह यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना राऊत म्हणाले की, २०२९ पर्यंत शाह गृहमंत्री राहणार नाहीत आणि नरेंद्र मोदीही पंतप्रधान राहणार नाहीत, हे ठाऊक असल्यानेच ते वैफल्यग्रस्त झाले आहेत. १२ कोटी मतदारांची नावे वगळणारे आणि ईव्हीएम घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार असलेले निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार तसेच सीमा खन्ना यांचीच भाषा अमित शाह यांच्या तोंडून बाहेर पडत असल्याचा आरोप त्यांनी केला.

निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांवर गंभीर ताशेरे ओढताना राऊत यांनी ज्ञानेश कुमार यांना 'माफिया' तर सीमा खन्ना यांना 'लेडी डॉन' असे संबोधले. त्यांना संरक्षण देण्यासाठीच कायदा करण्यात आला असून हा कायदा भ्रष्टाचाराला पाठीशी घालणारा असल्याचा आरोप त्यांनी केला. घुसखोरांची नावे वगळण्याबाबत बोलताना, माजी निवडणूक आयुक्त कुरैशी आणि देशाच्या माजी सैनिकांची नावे वगळली गेली, ते घुसखोर आहेत का असा सवाल करत, भाजपला मतदान न करणाऱ्यांना घुसखोर ठरवणे हीच शाह यांची व्याख्या असल्याचा घणाघात राऊत यांनी केला.

📌 महत्वाच्या बातम्या

MahaSatta News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या