प्रतिनिधी, 15 ऑक्टोबर: जंतरमंतरवर तिरंगा फडकवल्याप्रकरणी कॉकरोच जनता पार्टीचे सौरव दास आणि आशुतोष रांका यांना अटक करून पाच दिवसांची कोठडी सुनावण्यात आल्यानंतर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली आहे. या अटकेमुळे देशभरात संतापाचे वातावरण असल्याचा दावा करत, राऊत यांनी थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) राष्ट्रभक्तीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, जंतरमंतरवर केवळ आंदोलन करून तिरंगा फडकवल्यामुळे जर अटक होत असेल, तर हे घुसखोरांचे आणि ईस्ट इंडिया कंपनीचे सरकार आहे. देशभक्ती आणि वंदे मातरमचे गुणगान गाणारा आणि तिरंग्यासाठी आंदोलन करणारा संघ आता नेमका कुठे आहे, असा सवाल त्यांनी विचारला. तसेच स्वतंत्र भारतात तीन तरुणांना अटक झाली असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्वतः समोर येऊन बोलावे आणि नंतर भूमिगत होऊ नये, असे आव्हानही त्यांनी दिले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 'तांडव' विधानाचा समाचार घेताना राऊत यांनी, शिवाचे तांडव हेसुद्धा एक बंडच होते आणि शिंदेंना धर्म माहीत नाही, असा टोला लगावला. शिंदेंनी वेद-पुराण वाचण्यासाठी नागपूरला जाऊन बसावे, असा सल्ला देत 'तिसरा डोळा काय आमदार किंवा खासदार आहे का विकत घ्यायला?' अशी खोचक टिप्पणी त्यांनी केली. तसेच त्यांच्या बॉस अमित शाह यांना लाखोची गर्दी दिसत नसल्याचेही ते म्हणाले.
निवडणूक आयोगाच्या विरोधातील पुढील भूमिकेविषयी बोलताना राऊत यांनी स्पष्ट केले की, इंडिया आघाडीचे आंदोलन थांबणार नसून त्याचे स्वरूप बदलणार आहे. सध्या सणासुदीचे दिवस असल्याने लोक खरेदीसाठी बाहेर पडत आहेत, त्यामुळे प्रत्येक वेळी रस्त्यावर मोर्चा काढला जाणार नाही. सर्वोच्च न्यायालयातील आगामी सुनावणी हाही आंदोलनाचाच भाग असून रामलीला मैदानावर 'मॉक संसद' भरवून लोकांना याचे गांभीर्य समजावले जाईल. याचबरोबर ज्ञानेश कुमार हे माफिया असून त्यांना एक दिवस जावेच लागेल, हे अमित शाह यांनाही ठाऊक असल्याचा दावा त्यांनी केला.




