प्रतिनिधी, 13 ऑक्टोबर: नृत्यामुळे कायम चर्चेत असणाऱ्या आणि अनेकदा ट्रोलिंगचा सामना करणाऱ्या गौतमी पाटीलने तिच्या आयुष्यातील कठीण प्रसंगांवर उघडपणे भाष्य केले आहे. काही वर्षांपूर्वी कपडे बदलतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आपण आपले कार्यक्रम थांबवण्याचा विचार केला होता, असा धक्कादायक खुलासा तिने 'ग्रो मोशन'ला दिलेल्या नुकत्याच एका मुलाखतीत केला.
कपडे बदलतानाच्या त्या व्हायरल व्हिडिओबाबत संताप व्यक्त करताना गौतमी म्हणाली की, ज्याने तो व्हिडिओ व्हायरल केला, त्याच्याही घरात आई, बहीण किंवा मुलगी असेल. त्याला लाज नाही म्हणूनच त्याने एका मुलीचा व्हिडिओ व्हायरल केला. प्रत्येकाची वेळ येते आणि त्याला त्याच्या कृत्याची नक्कीच शिक्षा मिळेल, अशी संतप्त प्रतिक्रिया तिने दिली. लावणीच्या व्हिडिओवरून झालेल्या ट्रोलिंगपेक्षा या घटनेने तिला अधिक मानसिक धक्का बसला होता आणि आपण आता थांबले पाहिजे, असे तिला वाटून गेले होते.
या कठीण काळात तिच्या जवळच्या माणसांनी तिला मोठा आधार दिला. या घटनेनंतर जेव्हा तिने पहिला शो केला, तेव्हा लोक काय म्हणतील या भीतीने ती ग्रासली होती. त्यावेळी तिच्या संपूर्ण ग्रुपने तिला स्टेजपर्यंत सोबत केली होती. मात्र, प्रेक्षकांचा उत्साह आणि प्रेम पाहून आपण न थांबण्याचा निर्णय घेतल्याचे तिने स्पष्ट केले. याशिवाय, एका गाडीच्या प्रकरणातही आपल्याला जाणीवपूर्वक गोवण्यात आले होते, तरीही आपण न थांबल्याचे ती म्हणाली.
तत्पूर्वी, एका कार्यक्रमातील अयोग्य डान्स स्टेप्सच्या व्हायरल व्हिडिओवरूनही तिला लक्ष्य करण्यात आले होते. यावर बोलताना ती म्हणाली की, त्यावेळी तिच्यापेक्षाही वाईट स्टेप्स करणाऱ्या मुली होत्या, पण तिचाच व्हिडिओ उचलला गेला. त्या व्हिडिओबाबत तिने माफी मागून स्वतःमध्ये सुधारणा केली, तरीही तिला ट्रोल केले गेले. अनुभवातून आपण अनेक गोष्टी शिकत असल्याचे तिने नमूद केले.
कौटुंबिक अडचणींबद्दल सांगताना गौतमीने सांगितले की, तिचे वडील रोज मद्यपान करून आईला मारहाण करायचे व तिच्यावरही संशय घ्यायचे. त्या काळात तिच्या आईने एका कंपनीत काम केले. वडिलांची प्रकृती बिघडल्यावर तिने तातडीने ॲम्ब्युलन्स बोलावून त्यांना रुग्णालयात दाखल केले होते, जिथे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. वडिलांच्या निधनानंतर लगेचच शो केल्यावरूनही तिला प्रचंड ट्रोल केले गेले. मात्र, शो आयोजित करणाऱ्यांचे पैसे त्यात लागलेले असतात, असे सांगत तिने आपली भूमिका स्पष्ट केली.
📌 महत्वाच्या बातम्या
- माधुरीच्या प्रेमात कोण पडणार नाही? एका सीनमुळे रंगलेल्या अफेअरच्या चर्चांवर नाना पाटेकरांनी स्वतः दिले होते स्पष्टीकरण
- ज्ञानेश कुमार राजीनामा देणार नाहीत; कारण… : पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानाने खळबळ
- निवडणूक आयोग, मतचोरी आणि SIR: राहुल गांधींच्या निवासस्थानी विरोधकांची बैठक, मुख्य आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी रणनीती





