प्रतिनिधी, 13 ऑक्टोबर: सध्या ७ देशांतील ११ गायकांनी मिळून गायलेल्या एका विशेष भोजपुरी गाण्याची सर्वत्र चर्चा होत आहे. डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या सांगण्यावरून हे गाणे लिहिले गेले होते. 'बटोहिया' असे या प्रसिद्ध लोकगीताचे नाव असून, त्याला अनेकजण 'सुंदर सुभूमि भैया' म्हणूनही ओळखतात. हे गाणे भोजपुरीचे 'वंदे मातरम' म्हणूनही ओळखले जाते.
या गाण्याचा इतिहास १९११ सालाशी जोडलेला आहे. त्यावेळी बिहारमधील सारण जिल्ह्यात राहणारे विद्वान आणि वकील रघुबीर नारायण यांना डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी आपल्या मातृभाषेत लेखन करून मातीचा आवाज बनण्याचा सल्ला दिला होता. या शब्दांचा रघुबीर नारायण यांच्यावर खोल परिणाम झाला आणि त्यातूनच त्यांनी 'बटोहिया' या गाण्याची रचना केली, जे कालांतराने लोकांच्या मनावर राज्य करू लागले.
भोजपुरी भाषेत 'बटोही' म्हणजे वाटसरू किंवा प्रवासी, तर 'बटोहिया' म्हणजे त्या प्रवाशाला प्रेमाने मारलेली हाक. या गीतामध्ये केवळ मातृभूमीच्या सौंदर्याचे वर्णन नाही, तर आपल्या माणसांपासून दूर राहण्याचे मोठे दुःखही दडलेले आहे. ब्रिटिश काळात बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेशातील अनेक गरीब कामगारांना बागांमध्ये काम करण्यासाठी परदेशात पाठवण्यात आले होते. हजारो मैल दूर गेलेल्या या 'गिरमिटिया' मजुरांच्या व्यथेचे चित्रण या गाण्यातून करण्यात आले आहे.
परदेशात राहणारा एक मजूर जेव्हा भारताकडे जाणाऱ्या प्रवाशाला पाहतो, तेव्हा तो त्याच्याकडून देशाची खबर विचारतो आणि मातृभूमीला पाहून येण्याची विनंती करतो. 'जाऊ जाऊ भैया रे बटोही, हिंद देखी आउ….' या ओळींमधून त्या मजुराची देशाबद्दलची ओढ आणि वेदना व्यक्त होते. तसेच 'सुंदर सुभूमि भैया भारत के देसवा से…' या शब्दांतून भारताच्या नैसर्गिक सौंदर्याचे वर्णन केले आहे. यात हिमालयाला देशाचा रक्षक म्हटले असून तिन्ही दिशांना पसरलेल्या समुद्राचाही उल्लेख आहे.
भारत, सुरीनाम, हॉलंड, मॉरिशस, त्रिनिदाद, गयाना आणि फिजी या ७ देशांमधील ११ गायकांनी एकत्र येऊन हे गीत गायले आहे. यामध्ये कामाच्या शोधात देश सोडून गेलेल्या त्या गिरमिटिया मजुरांच्या वंशजांचाही समावेश होता. त्यांच्या अनेक पिढ्या परदेशात स्थायिक झाल्या असल्या तरी भारताशी असलेली त्यांची नाळ तुटलेली नाही. 'बटोहिया' सारखे गीत त्यांना आजही त्यांच्या पूर्वजांची माती, भाषा आणि संस्कृतीची आठवण करून देते.





