श्री साटम महाराजांची जीवनगाथा पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर, ‘दाणोलीश्वर’चे पोस्टर लाँच

कोकणातील दाणोली येथील श्री साटम महाराजांचा आध्यात्मिक प्रवास आता ‘दाणोलीश्वर : सद्गुरू श्री साटम महाराज’ या आगामी चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर उलगडणार आहे.

mahasatta

प्रतिनिधी, 13 ऑक्टोबर: कोकणात परमपूज्य मानल्या जाणाऱ्या श्री साटम महाराजांचा आध्यात्मिक प्रवास पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे. 'दाणोलीश्वर : सद्गुरू श्री साटम महाराज' या आगामी मराठी चित्रपटातून त्यांची जीवनगाथा प्रेक्षकांसमोर येणार असून, नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले आहे.

महाकाली प्रॉडक्शन आणि स्मिता क्रिएशन या निर्मिती संस्थांनी 'दाणोलीश्वर' चित्रपटाची निर्मिती केली आहे. मिलिंद सावंत, सुषमा मिलिंद घोगळे सावंत आणि स्मिता घाग या चित्रपटाचे निर्माते असून, रणजित विठ्ठल चव्हाण हे सहनिर्माते आहेत. कमलवल्लभदास यांनी लिहिलेल्या 'दाणोलीश्र्वर' या पुस्तकाचा संदर्भ घेऊन पराग कुलकर्णी यांनी चित्रपटाचे लेखन केले आहे, तर दिग्दर्शनाची धुरा विराज राजे सांभाळत आहेत.

समर्थ शंकर साटम महाराज यांचा जन्म १८८४ साली अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर झाला. मुंबईतून एका सामान्य व्यक्तीसारखा सुरू झालेला त्यांचा प्रवास अत्यंत अलौकिक ठरला. भारतभ्रमण केल्यानंतर ते कोकणातील सावंतवाडी जवळील दाणोली या गावात स्थिरावले. १९३७ पर्यंतच्या वास्तव्यात त्यांनी अनेक लीला व चमत्कार घडवून संकटात सापडलेल्या लाखो भाविकांना सन्मार्ग दाखवला. आपल्या सहज वागणुकीतून त्यांनी मानवी जीवनाचे मूल्य शिकवले. दाणोलीमध्ये समाधी घेतल्यानंतर आजही भक्तांमध्ये त्यांच्याविषयी मोठी श्रद्धा आहे.

साटम महाराजांची अथांग शिकवण आणि त्यांचा आध्यात्मिक वारसा या चित्रपटाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असल्याचे दिग्दर्शक विराज राजे यांनी सांगितले. आजवर अनेक साधू-संतांवर मराठी चित्रपट आले असून, आता त्यात 'दाणोलीश्वर'ची भर पडत आहे. मात्र, साटम महाराजांची मुख्य भूमिका कोणता अभिनेता साकारणार आणि इतर कलाकार कोण असतील, हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

MahaSatta News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या