सांगली, 13 ऑक्टोबर: सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरवला आहे. त्यामुळे पडळकर आता या निवडणुकीतून बाहेर पडले आहेत.
काँग्रेसचे माजी आमदार विक्रम सावंत यांनी पडळकर यांच्या उमेदवारीला आव्हान देत न्यायालयात याचिका दाखल केली होती. पडळकर यांच्याकडे संचालक पदाचा दोन वर्षांचा अनुभव नसणे आणि त्यांनी सादर केलेल्या अनुभवाच्या दाखल्याच्या मुद्द्यावर सुनावणी घेत कोल्हापूर खंडपीठाने त्यांची उमेदवारी रद्द केली.
या निकालानंतर याचिकाकर्ते विक्रम सावंत यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. 'न्यायव्यवस्था जिवंत आहे', अशी प्रतिक्रिया सावंत यांनी दिली. तसेच, ज्यांनी ज्यांनी खोटी कागदपत्रे देण्यासाठी मदत केली आहे, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
पडळकर यांची उमेदवारी रद्द झाल्याने स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे बदलण्याची चर्चा सुरू झाली आहे. या मोठ्या घडामोडीनंतर आता या निवडणुकीत महायुतीचे नेते काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






