दिल्लीतील मोर्चात विदेशी ताकदींचा हात; आंतरराष्ट्रीय कटाची शंका व्यक्त करत एकनाथ शिंदेंचा खळबळजनक आरोप

सर्वोच्च न्यायालयावरील मोर्चात विदेशी ताकदींचा हात असून हा आंतरराष्ट्रीय कटाचा भाग असल्याचा खळबळजनक आरोप एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर केला आहे.

mahasatta

प्रतिनिधी, 13 ऑक्टोबर: दिल्लीत इंडिया आघाडीने सर्वोच्च न्यायालयावर काढलेल्या मोर्चावर एकनाथ शिंदे यांनी सडकून टीका केली आहे. या आंदोलनात परकीय शक्तींचा हात असून हा एका आंतरराष्ट्रीय कटाचा भाग असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला. कालचा दिवस हा देशाच्या इतिहासातील 'काळा दिवस' असल्याचे म्हणत शिंदे यांनी राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचा तीव्र शब्दांत निषेध केला.

काल दिल्लीमध्ये राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि इंडिया आघाडीच्या खासदारांनी थेट सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढला होता. यावर भाष्य करताना शिंदे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधान दिले आणि महत्त्वपूर्ण संविधानिक संस्थांची निर्मिती केली. मात्र, सर्वोच्च न्यायालयावर चाल करून जाणे आणि त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करणे ही कधीही न घडलेली धक्कादायक घटना आहे. लोकशाहीत प्रत्येकाला अधिकार असला तरी, याचिका दाखल करण्यासाठी मोर्चा काढून जाण्याची पद्धत योग्य नसल्याचे त्यांनी सुनावले.

भारताच्या न्यायव्यवस्थेवर झालेल्या या हल्ल्याबद्दल विरोधकांनी देशाची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी शिंदे यांनी केली. लोकशाहीचा गळा घोटण्याचे आणि संविधान नष्ट करण्याचे काम विरोधकांमार्फत सुरू असून सध्याचे चित्र देशासाठी अत्यंत घातक आहे. देशाला अस्थिर करण्यासाठी विदेशी ताकदींचा वापर केला जात असून हा आंतरराष्ट्रीय कारस्थानाचाच एक भाग असल्याची शंका त्यांनी व्यक्त केली.

पंतप्रधानांचा निवडणुकीत पराभव करता येत नसल्यानेच विरोधकांकडून देशाला अराजकतेकडे ढकलण्याचे दुर्दैवी प्रयत्न सुरू आहेत, अशी टीका शिंदे यांनी केली. केंद्रात आपली सत्ता येणार नाही, या मानसिकतेतून विरोधकांकडून दररोज असे प्रकार केले जात आहेत. त्यांच्या या देशद्रोही मानसिकतेवर कायम बोलले पाहिजे, असे सांगत विरोधकच देशाच्या स्वातंत्र्यावर गदा आणून संविधान संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा घणाघात एकनाथ शिंदे यांनी केला.

📌 महत्वाच्या बातम्या

MahaSatta News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या