प्रतिनिधी, 13 ऑक्टोबर: शिवसेना (ठाकरे गट) विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या प्रकरणात पोलिसांच्या कारवाईवर पूर्णेकरांच्या मुलाने मोठा संशय व्यक्त केला आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारा हेल्मेटधारी मारेकरी आणि पोलिसांनी अटक केलेला अमित सिंग हे दोघे वेगळे व्यक्ती असून, त्यांची शरीरयष्टी अजिबात जुळत नसल्याचा दावा मुलाने केला आहे.
या गुन्ह्यातील सर्व मारेकऱ्यांना पकडण्यात यश आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. ओळख पटू नये म्हणून एका हल्लेखोराने डोक्यात हेल्मेट घातले होते. पोलिसांनी प्रयागराज येथून संतोष कनोजिया ऊर्फ टल्ली याच्यासह हेल्मेटधारी मारेकरी म्हणून अमित सिंगला ताब्यात घेतले आहे. मात्र, पकडण्यात आलेला हा पाचवा आरोपी कोणत्याही अँगलने हेल्मेट घातलेला मारेकरी वाटत नसल्याचे सांगत मुलाने पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
सध्या या प्रकरणातील तिन्ही आरोपी पोलिस कोठडीत आहेत. पप्या शिंदे याला १४ ऑक्टोबरपर्यंत, तर संतोष ऊर्फ टल्ली आणि अमित सिंग यांना १९ ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. पूर्णेकर यांना संपवण्याचा कट गेल्या काही महिन्यांपासून रचला जात होता. पोलिस आता गुन्ह्यातील कपडे आणि शस्त्रांचा शोध घेत असून, या तपासातून आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या प्रकरणात पूर्णेकर कुटुंबीयांनी शिवसेना (शिंदे गट) नेत्या आणि माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्यासह त्यांच्या पतीवर गंभीर आरोप केले आहेत. जबाबात त्यांची नावे घेत कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलनही केले. यानंतर उद्धव ठाकरे यांनी स्वतः पूर्णेकर कुटुंबीयांची भेट घेतली. तसेच, संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांनीही त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली असून, ठाकरे गटाने या प्रकरणावरून अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे.





