सर्वात मोठी बातमी ! मोदी सरकार सहा महिन्यात गाशा गुंडाळणार, संजय राऊतांचे मोठे भाकीत

येत्या सहा महिन्यांत मोदी सरकारला दिल्लीतून गाशा गुंडाळावा लागेल, असा मोठा दावा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे.

mahasatta

प्रतिनिधी, 13 ऑक्टोबर: मोदी सरकारला येत्या सहा महिन्यांत दिल्लीतून आपला गाशा गुंडाळावा लागेल, असा मोठा दावा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. आमच्यावर कितीही गुन्हे दाखल करा किंवा अटक करा, आम्ही अशा धमक्यांना घाबरणार नाही, असे थेट आव्हान त्यांनी केंद्र सरकारला दिले आहे.

काल पाच आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी सरकारवर जोरदार टीका केली. 'पाच काय, पाच हजार गुन्हे दाखल होऊ द्या. मुंबईतही आदित्य ठाकरे, अमित ठाकरे आणि वरुण सरदेसाई यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. तुम्हाला कुणाला अटक करायची ती करा, पण आता तुमची जाण्याची वेळ आली आहे,' असा इशारा राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिला.

काल झालेल्या आंदोलनावेळी पोलिसांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना रोखले होते. यावर राहुल गांधी यांनी 'आम्ही आंदोलन करायला कुठे बसायचे? या देशात हुकूमशाहाने आंदोलनावर बंदी आणली आहे का?' असा सवाल उपस्थित केला होता. लोकशाहीत अशा प्रकारे आंदोलनावर बंदी घालता येणार नाही आणि तशी बंदी घातलीच, तर नरेंद्र मोदींना राजीनामा द्यावा लागेल, असे राऊत यांनी स्पष्ट केले.

कालचे आंदोलन यशस्वी झाल्यानंतर आता राहुल गांधी यांनी आज 'इंडिया' आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. आज दुपारी ४ वाजता आघाडीच्या नेत्यांना चहापानासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. या बैठकीमध्ये चर्चा करून पुढील आंदोलनाची आणि संघर्षाची दिशा संध्याकाळपर्यंत निश्चित केली जाईल, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

दरम्यान, शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आज सुनावणी पार पडत आहे. यावर भाष्य करताना संजय राऊत यांनी ही सुनावणी लवकरात लवकर संपण्याची अपेक्षा व्यक्त केली. तसेच, देशाच्या लोकशाहीला नवी ऊर्जा देणारा निर्णय यातून येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

📌 महत्वाच्या बातम्या

MahaSatta News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या