प्रतिनिधी, 13 ऑक्टोबर: हॉलिवूडमधून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अमेरिकन ड्रामा सीरिज ‘ब्रेकिंग बॅड’ फेम अभिनेता आरजे मिट्टे याचं वयाच्या ३४ व्या वर्षी निधन झालं. त्याच्या प्रतिनिधींनी या वृत्ताला दुजोरा दिला असून १२ ऑक्टोबर २०२६ रोजी त्याने अखेरचा श्वास घेतला. सध्या त्याच्या मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होऊ शकलेलं नाही.
आरजे मिट्टेच्या निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे, मृत्यूच्या अवघ्या पाच दिवस आधी म्हणजेच ७ ऑक्टोबरला त्याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. जो व्हुल्पिस यांच्या पॉडकास्टमधील या मुलाखतीमध्ये त्याने ‘ब्रेकिंग बॅड’मधील व्हाइट कुटुंबाची कथा पुन्हा पडद्यावर येण्याबाबत आपली इच्छा व्यक्त केली होती.
या सीरिजचा शेवट हा केवळ हेझेनबर्गच्या प्रवासाचा शेवट होता, संपूर्ण कुटुंबाची कथा तिथे संपलेली नाही, असं मत त्याने मांडलं होतं. वॉल्टर व्हाइट, स्कायलर आणि त्यांची मुलगी होली यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टी अजूनही प्रेक्षकांसमोर येऊ शकतात, असे संकेत त्याने या व्हिडीओत दिले होते.
‘ब्रेकिंग बॅड’मध्ये त्याने वॉल्टर व्हाइट ज्युनियर (फ्लिन) ही भूमिका साकारली होती, ज्यामुळे त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली. या मालिकेत ब्रायन क्रॅन्स्टन आणि अॅना गन यांनी अनुक्रमे वॉल्टर व स्कायलर व्हाइटची भूमिका निभावली होती. याशिवाय आरजे मिट्टेने ‘स्विच्ड अॅट बर्थ’ आणि ‘द गार्डियन्स ऑफ जस्टिस’ या सीरिजमध्येही काम केलं होतं.
आरजे मिट्टेला लहानपणीच सेरेब्रल पाल्सी असल्याचं निदान झालं होतं आणि त्याच्या ‘ब्रेकिंग बॅड’मधील पात्रालाही हीच स्थिती दाखवण्यात आली होती. आपल्या स्वतःच्या अनुभवातून त्याने या भूमिकेत वास्तववादी रंग भरले. अभिनयाव्यतिरिक्त तो युनायटेड सेरेब्रल पाल्सी आणि श्रायनर्स चिल्ड्रन्स या संस्थांचा अॅम्बेसेडर होता, तसेच दिव्यांग व्यक्तींच्या समान हक्कांसाठी तो कायम प्रयत्नशील राहिला.





