सलमान खान पुन्हा ‘कॉफी विथ करण’मध्ये; ‘मी व्हर्जिन…’ वक्तव्यानंतर आता कोणतं गुपित उघडणार?

सलमान खान करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ शोच्या ९ व्या सीझनमध्ये दिसणार आहे. यापूर्वी त्याने याच शोमध्ये ‘मी व्हर्जिन आहे’ असा खुलासा केला होता.

mahasatta

प्रतिनिधी, 13 ऑक्टोबर: बॉलिवूड अभिनेता सलमान खानचे नाव आजवर अनेक लोकप्रिय अभिनेत्रींसोबत जोडले गेले, मात्र त्याचे कोणतेच नाते लग्नापर्यंत पोहोचू शकले नाही. सलमानने स्वतःच्या खासगी आयुष्याबाबत अनेकदा उघडपणे भाष्य केले आहे. काही वर्षांपूर्वी दिग्दर्शक करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या शोमध्ये 'मी व्हर्जिन आहे' असे सांगून त्याने मोठी खळबळ उडवून दिली होती. आता सलमान पुन्हा एकदा याच शोच्या ९ व्या सीझनमध्ये हजेरी लावणार असून, तो स्वतःबद्दल आणखी कोणते नवे खुलासे करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

'कॉफी विथ करण'चा हा ९ वा सीझन या लोकप्रिय शोचा शेवटचा सीझन असणार आहे. करण जोहरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून सलमान खान या शोमध्ये सहभागी होणार असल्याची घोषणा केली आहे. या पोस्टमध्ये सर्वात आधी सलमानचे आयकॉनिक ब्रेसलेट आणि त्यानंतर त्याची एक झलक पाहायला मिळते. यावरून सलमानने शोमध्ये येण्याचे जाहीर केल्याचे स्पष्ट होते.

मागील अनेक सीझनमध्ये बड्या सेलिब्रिटींनी त्यांच्या खासगी आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल मोठे खुलासे केले आहेत. आता या शेवटच्या सीझनमध्ये सलमान पहिल्या एपिसोडमध्ये दिसणार की शेवटच्या, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र, १४ ऑक्टोबरपासून 'जिओ हॉटस्टार'वर हा शो प्रसारित होणार असल्याचे निश्चित झाले आहे.

याआधी सलमानने 'कॉफी विथ करण'च्या चौथ्या सीझनच्या पहिल्या भागात भाग घेतला होता. त्यावेळी करणच्या प्रश्नांना उत्तरे देताना त्याने आपण 'व्हर्जिन' असल्याचे जाहीर केले होते. तसेच 'रॅपिड-फायर' राऊंडमध्येही त्याने दिलेल्या धक्कादायक उत्तरांमुळे तो भाग अविस्मरणीय ठरला होता. आपल्या स्पष्टवक्तेपणाने नेहमीच लक्ष वेधून घेणारा सलमान आता पुन्हा तोच इतिहास घडवणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

MahaSatta News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या