बँकेच्या लॉकरची चावी हरवली? घाबरू नका, जाणून घ्या नवीन चावी मिळवण्याची संपूर्ण प्रक्रिया

बँकेच्या लॉकरची चावी हरवल्यास ग्राहकांना काय करावे लागते, किती खर्च येतो आणि नवीन चावी मिळवण्याची प्रक्रिया काय आहे? जाणून घ्या सविस्तर माहिती.

mahasatta

प्रतिनिधी, 12 ऑक्टोबर: बँकेच्या लॉकरमध्ये आपण दागिने, महत्त्वाची कागदपत्रे आणि मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवतो. त्यामुळे लॉकरची चावी हरवल्यास साहजिकच ग्राहकांची चिंता वाढते. मात्र, अशा परिस्थितीत घाबरून न जाता सर्वात आधी संबंधित बँक शाखेला याची तातडीने माहिती देणे आवश्यक असते.

घरच्या कुलपाची दुसरी चावी सहज बनवता येते, पण बँकेच्या लॉकरची परिस्थिती वेगळी असते. बँकेचे लॉकर उघडण्यासाठी दोन वेगवेगळ्या चाव्या लागतात. यापैकी एक चावी बँकेकडे, तर दुसरी ग्राहकाकडे असते. ग्राहकाकडे असलेल्या चावीची अतिरिक्त प्रत बँकेकडे उपलब्ध असेलच असे नाही.

चावी गहाळ झाल्याचे बँकेला कळवल्यानंतर, बँक प्रथम ग्राहकाची ओळख पडताळते. त्यानंतर ग्राहकाकडून आवश्यक कागदपत्रे आणि लेखी हमीपत्र मागितले जाते. तसेच, काही बँकांच्या अंतर्गत प्रक्रियेनुसार ग्राहकाला या प्रकरणी पोलिसांत तक्रार करण्यासही सांगितले जाऊ शकते.

पुढील टप्प्यात, बँक लॉकरचा क्रमांक आणि त्याच्या नमुन्याची माहिती लॉकर तयार करणाऱ्या कंपनीला पाठवते. कंपनीचा अधिकृत तंत्रज्ञ बँकेत येऊन लॉकरची तपासणी करतो. नवीन चावी मिळवणे शक्य नसल्यास लॉकरचे कुलूप तोडले जाते. हे कुलूप तोडण्यापूर्वी किंवा लॉकर उघडण्यापूर्वी ग्राहकाची लेखी परवानगी घेतली जाते आणि ही सर्व प्रक्रिया बँक किंवा अधिकृत तंत्रज्ञाच्या मार्फतच पार पडते.

नवीन चावी बनवणे, कुलूप बदलणे किंवा लॉकर तोडणे या सर्व प्रक्रियेचा आर्थिक भुर्दंड ग्राहकालाच सहन करावा लागतो. काही प्रकरणांमध्ये हा खर्च हजारो रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. तंत्रज्ञाची उपलब्धता, लॉकरची तपासणी आणि कागदपत्रांची पूर्तता यावर या प्रक्रियेचा वेळ अवलंबून असतो. हे काम लगेच पूर्ण होत नाही, त्यासाठी १५ दिवस किंवा त्याहून अधिक काळ लागू शकतो.

📌 महत्वाच्या बातम्या

Maha Satta

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या