IND vs NZ : वैभव सूर्यवंशीची नाहक चर्चा टीमसाठी नुकसानकारक, बॅटिंग कोच सितांशू कोटक यांचे स्पष्ट मत

भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांनी युवा खेळाडू वैभव सूर्यवंशीच्या संघातील जागेबाबत आणि त्याच्याभोवती असलेल्या चर्चेवर स्पष्ट मत मांडले आहे.

mahasatta

प्रतिनिधी, 23 ऑक्टोबर: भारतीय संघाचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याच्याबद्दल निर्माण झालेले वलय (हाइप) त्याच्या स्वतःसाठी आणि संघासाठीही हितावह नसल्याचे स्पष्ट मत भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांनी व्यक्त केले आहे. सध्या वैभवला भारतीय संघातून खेळण्याची प्रतीक्षा करावी लागत असून, त्याच्याकडे गुणवत्ता असली तरी संघात जागा उपलब्ध नसल्याने विविध मतप्रवाह पाहायला मिळत आहेत.

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यापूर्वी कोटक यांनी ही प्रतिक्रिया दिली. पहिल्या टी-२० सामन्यात इशान किशनला दुखापत झाल्यामुळे शनिवारी वैभवला खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. या संभाव्य संधीबद्दल कोटक यांनी उत्साह व्यक्त केला असला तरी, त्याच्याभोवती असलेल्या अतिरिक्त चर्चेचा कोणालाही फायदा नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

वैभवच्या लोकप्रियतेवर बोलताना कोटक म्हणाले, "तो अजून वयाने लहान आहे, पण संघ व्यवस्थापन त्याची काळजी घेत आहे. मी याकडे निष्पक्षपणे पाहतो. वैभव प्रत्येकाला आवडतो आणि सोशल मीडियावरही तो लोकप्रिय आहे. पण केवळ लोकांना तो आवडतो म्हणून आम्ही प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करू शकत नाही. तो प्रतिभावान आहे आणि त्याचे भविष्य उज्ज्वल असल्याचा मला विश्वास आहे. त्यामुळे जेव्हा कधी त्याला संधी मिळेल आणि तो टीममध्ये सेट होईल, तेव्हा त्याला बरेच काही शिकायला मिळेल."

सुरुवातीला वैभवला संधी देण्यावरून होणाऱ्या मागणीबद्दल सांगताना कोटक म्हणाले, "सुरुवातीला चर्चा होती की त्याला खेळवलंच पाहिजे. मला खरोखरच असे वाटले की, हे त्या खेळाडूसाठी सुद्धा चांगले नाही. कारण तो आता १५-१६ वर्षांचा आहे. प्रत्येकजण म्हणतोय की तो खेळला पाहिजे, त्याला टीममध्ये घेत नाहीयेत, वगैरे वगैरे.. पण तो आता लहान आहे."

भारतीय संघात सध्या संजू सॅमसन, अभिषेक शर्मा आणि इशान किशन या तीन टॉप फलंदाजांना प्राधान्य दिले जात आहे. याबाबत बोलताना कोटक यांनी स्पष्ट केले, "तो आता समजूतदार झालाय. संजू सॅमसन आणि अभिषेक चांगली कामगिरी करत असल्याने त्यांना टीममधून कसे बाहेर बसवले जाऊ शकते, हे त्याच्या लक्षात आले आहे. मधल्या फळीतही फलंदाज आहेत. त्याला खेळायची इच्छा असेल आणि मी त्याच्या जागी असतो तर माझीसुद्धा हीच इच्छा असती. पण म्हणून त्याने कुठे तक्रार केलेली नाही किंवा तो निराश झालेला दिसला नाही. चेंडू जोरात मारण्याची कला एक वेगळी गोष्ट आहे, पण या लेव्हलवर तुम्ही जे शिकता ते पूर्णपणे वेगळे असते. तो हे सर्व शिकेल आणि याचा त्याला फायदा होईल."

📌 महत्वाच्या बातम्या

MahaSatta News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या