प्रतिनिधी, 24 ऑक्टोबर: न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताचा युवा खेळाडू तिलक वर्माने क्षेत्ररक्षणात ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या सामन्यात दोन झेल घेत त्याने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये एकाच कॅलेंडर वर्षात क्षेत्ररक्षक म्हणून सर्वाधिक २६ झेल घेण्याचा विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे.
सामन्याच्या दुसऱ्या षटकात अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीवर तिलकने पहिला झेल टिपला. या षटकातील तिसऱ्या चेंडूवर ऑन साईडला मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात असलेल्या टीम सायफर्टला त्याने अवघ्या ७ धावांवर माघारी धाडले. त्यानंतर लगेचच तिसऱ्या षटकात भुवनेश्वर कुमारच्या शेवटच्या चेंडूवर कव्हर्सच्या दिशेने मारलेला डॅरेल मिचेलचा (६ धावा) झेलही तिलकनेच पकडला.
या खास कामगिरीमुळे तिलक वर्मा हा एका वर्षात (२०२६ मध्ये) सर्वाधिक २६ झेल घेणारा पहिला खेळाडू ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम इंडोनेशियाच्या डॅनिलसन हावोच्या नावावर होता, ज्याने २०२५ मध्ये २५ झेल घेतले होते. या विक्रमाच्या यादीत आता युएईचा मोहम्मद वसीम (२०२४ मध्ये २४ झेल), मलेशियाचा शर्विन मुनियांडी (२०२५ मध्ये २१ झेल), युगांडाचा ब्रायन मसाबा (२०२३ मध्ये २० झेल) आणि बांगलादेशचा तंजीद हसन (२०२५ मध्ये २० झेल) यांचा समावेश आहे.
याच सामन्यात तब्बल चार वर्षांनी भारतीय संघात पुनरागमन करणाऱ्या भुवनेश्वर कुमारला १४३४ दिवसांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विकेट मिळाली. वेस्ट इंडिज दौऱ्यात त्याचे संघात पुनरागमन झाले होते, मात्र पावसामुळे सामना रद्द झाल्याने त्याला गोलंदाजीची संधी मिळाली नव्हती. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात त्याने चार षटकांत ४९ धावा दिल्या, मात्र त्याला विकेट मिळाली नव्हती. अखेर दुसऱ्या सामन्यात त्याने यश मिळवले.
📌 महत्वाच्या बातम्या
- न्यूझीलंडच्या मैदानावर उतरताच १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीने रचला इतिहास; मोडला सर्वांत युवा क्रिकेटपटूचा विक्रम
- मुंबई इंडियन्सचा मोठा निर्णय; माहेला जयवर्धनेच्या जागी कायरन पोलार्डची नवा ‘हेड कोच’ म्हणून घोषणा
- न्यूझीलंड अ विरुद्ध ‘इंडिया अ’ची लाजिरवाणी फलंदाजी, राहुल, जैस्वाल अपयशी




