IND vs NZ : रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडत अभिषेक शर्मा ठरला टी-२० पॉवरप्लेचा नवा ‘सिक्सर किंग’

पहिल्या टी-२० सामन्यात धडाकेबाज फलंदाजी करत अभिषेक शर्माने पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा ‘हिटमॅन’ रोहित शर्माचा मोठा विश्वविक्रम मोडला आहे.

mahasatta

क्राइस्टचर्च, 22 ऑक्टोबर: न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात भारताचा सलामीवीर अभिषेक शर्माने एक मोठा विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे. २२६ धावांच्या तगड्या लक्ष्याचा पाठलाग करताना अभिषेकने आक्रमक सुरुवात केली आणि 'हिटमॅन' रोहित शर्माचा पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम मोडीत काढला.

या सामन्यात अभिषेकने केवळ १२ चेंडूंचा सामना करताना २ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने २९ धावा चोपल्या. डावाच्या सहाव्या षटकात मायकल ब्रेसवेलने त्याला बाद करत तंबूचा रस्ता दाखवला. मात्र, बाद होण्यापूर्वी त्याने संजू सॅमसनसोबत मिळून ९३ धावांची भक्कम सलामी दिली. सॅमसननेही धडाकेबाज खेळ करत ३३ चेंडूत ६७ धावांची खेळी साकारली.

अभिषेकला या सामन्यात मोठी खेळी करता आली नसली तरी, टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या पॉवरप्ले षटकांमध्ये तो आता नवा 'सिक्सर किंग' ठरला आहे. २६ वर्षीय अभिषेकने आपल्या कारकिर्दीतील ६८ सामन्यांमध्ये एकूण १४६ षटकार मारले असून, यातील ९९ षटकार फक्त पॉवरप्लेमध्ये ठोकले आहेत. टी-२० क्रिकेटच्या इतिहासात कोणत्याही फलंदाजाने पॉवरप्लेमध्ये मारलेले हे सर्वाधिक षटकार आहेत.

यापूर्वी हा विक्रम रोहित शर्माच्या नावावर होता. रोहितने आपल्या कारकिर्दीत पॉवरप्लेमध्ये ९८ षटकार मारले होते. भारताकडून १५९ सामने खेळताना रोहितच्या नावावर एकूण २०५ षटकार आहेत. सध्या कसोटी आणि टी-२० क्रिकेटमधून निवृत्त झालेला रोहित केवळ एकदिवसीय सामने खेळतो. पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंडचा माजी फलंदाज मार्टिन गुप्टिल असून त्याने १२२ सामन्यांत ९७ षटकार लगावले आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

MahaSatta News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या