कात्रज डेअरीच्या दुधात ४ रुपयांची वाढ; १६ नोव्हेंबरपासून नवे दर लागू

कात्रज डेअरीने दुधाच्या दरात प्रतिलिटर ४ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, १६ नोव्हेंबरपासून ग्राहकांना सुधारित दराने दूध खरेदी करावे लागणार आहे.

mahasatta

प्रतिनिधी, 13 नोव्हेंबर: पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेडने (कात्रज डेअरी) दुधाच्या दरात प्रतिलिटर चार रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १६ नोव्हेंबरपासून हे सुधारित दर लागू होणार असून, वाढत्या महागाईच्या काळात सर्वसामान्यांना याचा मोठा फटका बसणार आहे.

कात्रज डेअरीच्या दूध उत्पादक आणि व्यावसायिक संघाच्या बैठकीत या दरवाढीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. या बदलामुळे पूर्वी ६२ रुपये प्रतिलिटर दराने मिळणाऱ्या कात्रजच्या दुधासाठी आता ग्राहकांना ६६ रुपये मोजावे लागतील. दुधाव्यतिरिक्त ताक, दही आणि पनीर यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांच्या किमतीतही साधारणतः १० टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पुणे व परिसरातील ग्राहकांचे घरगुती बजेट कोलमडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिला जाणारा खरेदी दर आणि ग्राहकांकडून आकारला जाणारा किरकोळ विक्री दर यातील वाढती तफावत हे या निर्णयामागचे प्रमुख कारण असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय पशुखाद्य, वाहतूक आणि प्रक्रियेसह उत्पादनाच्या इतर खर्चात मोठी वाढ झाल्याने डेअरी व्यवसायावर आर्थिक ताण येत होता. यापूर्वी अमूल आणि मदर डेअरीसारख्या प्रमुख ब्रँड्सनीही दरवाढ केली होती, त्याच धर्तीवर कात्रज डेअरीने हे पाऊल उचलले आहे.

या निर्णयाबाबत माहिती देताना संघटनेचे सचिव प्रकाश कुतवळ यांनी स्पष्ट केले की, वाढीव खरेदी दरामुळे शेतकरी वर्गाला मोठा आधार मिळणार आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले, “तुकाराम मुंढेंच्या कारवाईमुळे दुधात अमुलाग्र बदल झाले आहेत. आमच्या पनीरच्या किमतीत वाढ झाली असून, सध्या आम्हाला दुधाची गुणवत्ता अतिशय चांगली मिळत आहे.”

📌 महत्त्वाच्या बातम्या

MahaSatta News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या