मुंबई, 13 नोव्हेंबर: मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका जवानाने नैराश्यातून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विजय बागुल असे या मृत पोलीस शिपायाचे नाव असून ते सध्या दिंडोशी पोलीस ठाण्यात कार्यरत होते.
बागुल हे कुर्ला येथील नेहरूनगर पोलीस वसाहतीमध्ये कुटुंबासह राहत होते. मिळालेल्या माहितीनुसार, ते गेल्या अनेक दिवसांपासून पायाच्या अंतर्गत दुखापतीने त्रस्त होते. वैद्यकीय उपचार करूनही पायाच्या वेदना कमी होत नसल्याने ते मानसिकदृष्ट्या खचले होते. याच नैराश्यातून त्यांनी जीवन संपवण्याचा निर्णय घेतला.
राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्यानंतर बागुल यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. बागुल हे २००९ मध्ये मुंबई पोलीस दलात भरती झाले होते आणि गेल्या चार वर्षांपासून ते दिंडोशी पोलीस ठाण्यात आपली सेवा बजावत होते.
त्यांच्या पश्चात पत्नी कोमल, दहा वर्षांचा मुलगा यश आणि सहा वर्षांची मुलगी श्रावणी असा परिवार आहे. बागुल यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी नाशिक येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात असून, पोलिसांच्या आत्महत्यांचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
📌 महत्त्वाच्या बातम्या
- सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी: भिवंडीचा विवेक शेलार महाराष्ट्र संघात, ऋतुराज गायकवाडसोबत खेळणार
- आयपीएल २०२७: केकेआरने मिनी लिलावात शाई होपसाठी पूर्ण ताकद का पणाला लावावी?
- करार संपूनही घर न सोडणाऱ्या भाडेकरूला दणका; दुप्पट दंड वसुलीचा पहिला ऐतिहासिक निकाल




